विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देत असताना राहुल नार्वेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. २०१८ साली केलेली शिवसेना पक्षातील घटनादुरुस्ती त्यांनी अमान्य केली. निवडणूक आयोगाने दिलेली घटना ग्राह्य धरण्यात आली. १९९९ च्या घटनेच्या आधारावर त्यांनी निकाल दिला. शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून पुन्हा एकदा लोकशाहीचा विजय झाल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी निकाल आपल्या बाजूने लागल्यावर ‘एक्स’ वर पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, ”सर्वप्रथम राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. आज लोकशाहीचा पुन्हा एकदा विजय झाला. २०१९मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राज्यातील लाखो मतदारांचा आज विजय झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन निघालेल्या शिवसैनिकाचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आजचा विजय हा सत्याचा विजय आहे. सत्यमेव जयते…
आजचा निकाल हा कुणा एका पक्षाचा विजय नसून, भारतीय संविधानाचा आणि लोकशाहीचा विजय आहे. लोकशाहीमध्ये नेहमी बहुमताला महत्त्व असते. शिवसेना हा मूळ पक्ष अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिला आहे आणि धनुष्यबाणही आमच्याकडे दिले आहे. निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती ते लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही , हे या निकालाने अधोरेखित केले आहे.
अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल आहे. मतदारांच्या मताचा सन्मान करणारा आणि लोकशाहीत त्याचा निर्णयाधिकार अबाधित ठेवणारा हा निकाल आहे. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करू, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेने उभे राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे.”
https://twitter.com/mieknathshinde/status/1745114954058150391?t=vuP7jE9ffEscnlyJzsKsFg&s=19
दरम्यान, ठाकरे गट राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना निर्लज्जपणाचा कळस गाठला, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला अशा प्रकारची टीका ठाकरे गटाकडून अध्यक्षांवर करण्यात आली आहे.