येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक नेतेमंडळी, कलाकार, परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी उपस्थित राहणार नाहीत. या सोहळ्याचे निमंत्रण नाकारताना काँग्रेसने हा सोहळा भाजप आणि आरएसएसचा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी जोरदार टीका केली आहे.
बुधवारी एएनआयशी बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले, ”काँग्रेसने भव्य राम मंदिराच्या उद्घटनाचे आमंत्रण नाकारणे म्हणजे हे तर देशाची ओळख नाकारण्यासाखे आहे. राम आपले देव आहेत. राम भारताच्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसने हे राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारणे म्हणजे भारताची अस्मिता आणि संस्कृती नाकारणे होय.”
तसेच शिवराज सिंह यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी देखील काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसकडे अयोध्येला जाण्यासाठी ”नैतिक ताकद” नाही. गिरिराज सिंह एएनआयशी बोलताना म्हणाले, ”हे लोक हंगामी हिंदू आहेत. त्यांना जेव्हा वाटते की आपल्याला मते मिळवायची आहेत, तेव्हा ते हिंदू होण्याचा प्रयत्न करतात.” तसेच पुढे बोलताना गिरीराज सिंह म्हणाले, ”न्यायालयात खटला प्रलंबित ठेवण्याचे काम काँग्रेस पक्षानेच केले होते. त्यामुळे त्यांच्याकडे अयोध्येला जाण्याची नैतिक ताकद नाही.”
दरम्यान, २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यानिमित्त अनेक राजकीय नेते विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. २२ जानेवारीला पहाटे पूजेनंतर, दुपारी ‘मृगशिरा नक्षत्र’मध्ये रामलल्लाचा अभिषेक केला जाणार आहे.