नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी नागपूर न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह पाच आरोपींना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेतून जामिन मिळवण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल केला होता. नागपूर खंडपीठाने विविध अटी-शर्तींसह सुनील केदार यांना जामीन मंजूर केला होता. मात्र जेलमधून बाहेर आल्यावर त्यांनी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता यामुळेच त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रॅली काढून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी सुनील केदार यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस यावर कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी नागपूर न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा व १२ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर त्यांची आमदारकी रद्द झाली. सुनील केदार यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र सत्र न्यायालयाने जामिनाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर नागपूर खंडपीठाने त्यांनी जामीन मंजूर केला आहे. मात्र कालच्या रॅलीमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कारण रॅलीसाठी त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांच्या रॅलीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तसेच कारागृह परिसरात गर्दी केल्याने त्यांच्यावर एफआयआर दाखल झाले आहे.