आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) घटक पक्षांच्या नेत्यांची आज व्हर्चुअल बैठक पार पडली. यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, एमके स्टॅलिन आणि इतर विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
मात्र बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारत आघाडीचे समन्वयक बनवण्याबाबत चर्चा झालीअसून नितीश कुमार यांनी हे पद नाकारले तसेच दुसऱ्या कोणाला तरी संयोजक म्हणून नियुक्त करण्याची विनंती काँग्रेसला केली आहे. तसेच या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत.
या बैठकीत काँग्रेसने ‘भारत जोडो न्याय यात्रे’वरही चर्चा केली आणि सर्व पक्षांच्या नेत्यांना या यात्रेला पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.