Milind Deora : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आजच शिंद गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.
मिलिंद देवरा यांनी X वर त्यांच्या राजीनाम्याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज माझ्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाच्या अध्यायाचा शेवट करत आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसशी माझ्या कुटुंबाचे 55 वर्षांपासूनचे संबंध आज संपवत आहे. तसेच इतके वर्ष मला पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसमधील नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे.
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मिलींद देवरा हे दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांसह देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/milinddeora/status/1746368092736037291
दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्यासाठी मिलिंद देवरा हे इच्छुक आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 साली निवडून आले. त्यामुळे मिलिंद देवरांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होते. या कारणामुळेच देवरा शिवसेनेमध्ये (शिंदे गट) जाण्याची शक्यता आहे.