काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज (14 जानेवारी) काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर ते आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणा आले आहे. तर आता मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केले आहे.
मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवरा हे पक्षप्रवेश करत आहेत हे मी देखील ऐकतोय. याबाबत अद्याप मला माहिती नाही. पण ते पक्षप्रवेश करणार असतील तर मी त्यांचे स्वागत करतो. शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे आले होते. यावेळी त्यांनी रामदास कदमांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
पुढे रामदास कदमांची भेट घेण्याबाबत बोलताना शिंदेंनी सांगितले की, रामदास कदम हे आमचे भाई आणि शिवसेनेचे नेते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत खराब होती, म्हणून मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो.
दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर मिलींद देवरा हे दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक आणि 25 पदाधिकाऱ्यांसह देवरा शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.