पौष महिन्याच्या प्रतिपदेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.हिंदू सणाची कालगणना चंद्राप्रमाणे पंचांगावर आधारित असते परंतु मकर संक्रांतीचे पर्व सूर्याच्या राशीबदलाप्रमाणे ठरविले जाते. तसं तर सूर्य प्रत्येक महिन्याला राशीबदल करीत असतो,त्यामुळे प्रत्येक महिन्यात संक्रांत (राशीबदल किंवा संक्रमण) असतेच. पण सूर्याच्या मकर संक्रमणाच्या वेळी उत्तरायणाला सुरुवात होते म्हणजेच पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकतो. त्यामुळे या संक्रमणाला विशेष महत्व आहे. त्यामुळे मकर संक्रांतीची तारीख दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी हीच असते.
मकर संक्रांतीपासून ऋतुपरिवर्तन होते.शरद ऋतु क्षीण होतो आणि वसंत ऋतूची चाहूल लागायला सुरुवात होते. दिवस मोठे होत जातात आणि रात्री लहान होत जातात.भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे.
नवीन पिकं येतात आणि नवीन ऋतूचे आगमन यामुळे वातावरण उत्साही आणि आनंदी असते त्यामुळे ही मकर संक्रांत पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये लोहडी या नांवाने साजरी केली जाते. तामिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यात मकर संक्रांत पोंगल म्हणून साजरी केली जाते. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी या नांवाने मकर संक्रांत ओळखली जाते. आसाममध्ये ही संक्रांत बिहू या नांवाने प्रचलित आहे. तर गुजरातमध्ये या सणाला पतंगोत्सव साजरा करतात, व खूप मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात.
मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसापासून ते माघ महिन्याच्या सप्तमी पर्यंत (म्हणजेच रथसप्तमीपर्यंत) आपल्या महाराष्ट्रात सुवासिनी एकमेकींना हळदीकुंकू आणि तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणतात आणि निरनिराळ्या वस्तूंचे,धान्यांचे वाण दिले जाते. सोबत तीळ आणि गुळाची वडी, पांढरा शुभ्र हलवा हे पण दिले जाते. घरामध्ये असलेली छोटी बाळे किंवा घरात नवीन लग्न होऊन आलेल्या सुनबाई यांना हलव्याचे दागिने घालून त्यांची तिळवण किंवा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या वेळेस बसू शकणाऱ्या लहान मुलांना काळे झबले आणि त्यावर हलव्याचे दागिने घालून बोरनहाण पण घातले जाते.
या वेळेला हवेत गारठा असल्यामुळे काळी वस्त्रे परिधान केली जातात.
या दिवसात हवेतल्या गारव्यामुळे शरिरात आलेला रुक्षपणा घालविण्यासाठी घरोघरी गुळाची पोळी साजूक तुपाबरोबर खाण्याची पद्धत आहे. एकूणच हवा चांगली असल्यामुळे सगळ्यांना भूक लागते आणि त्यामुळे दोन घास जास्तीचे जेवण होते,आणि त्यामुळे जेवण पचून शरीराला ऊर्जा मिळते. या दिवसात तयार होणाऱ्या भाज्या ( मटार,पावटा, उसाचे कर्वे,ओले हरभरे,बोरे, गाजर, रेवड्या) ह्या मातीच्या सुगडात घालून हे वाण पण सुवासिनी एकमेकींना देतात.
एकूणच काय नवीन आलेली पिके,धन धान्याची सुबत्ता आणि वातावरणातला उत्साह यामुळे त्यातून मिळणारा आनंद एकमेकांना लुटण्याचा हा सण आहे.
सौ. अंकिता कुलकर्णी
रुक्मिणी शाखा,लष्कर भाग, पुणे