नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीबाबत आपचे नेते आणि खासदार राघव चड्ढा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. चंदीगढ येथून इंडिया आघाडीचा विजय रथ सुरू होणार आहे. तसेच ही भाजपसोबतची पहिलीच लढत असेल, असे भाकीत राघव चड्ढा यांनी केले आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने 18 जानेवारी रोजी होणाऱ्या चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना राघव चड्ढा म्हणाले की, “18 जानेवारी रोजी होणारी चंदीगड महापौर निवडणूक ही सार्वत्रिक निवडणूक नाही. ही निवडणूक या देशाच्या राजकारणाचे चित्र आणि दिशा बदलून टाकणारी आहे. यामुळे पाया रचला जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी युती म्हणून इंडिया आघाडी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात भाजपसोबत लढणार आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध इंडिया असा हा पहिला सामना असेल.”
“आम्हाला विश्वास आहे की इंडिया आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढेल आणि ऐतिहासिक आणि निर्णायक विजय नोंदवेल. इंडिया आघाडीचा हा विजय रथ केवळ चंदीगडपर्यंत थांबणार नाही, तर तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारेल,” असेही राघव चड्ढा म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जेव्हाही भारतीय क्रिकेट संघाचा इतर कोणत्याही संघाशी सामना होतो तेव्हा देशातील जनतेने टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. तसेच जनता या महापौरपदाच्या निवडणुकीतही इंडिया आघाडीला विजयी करतील आणि या निवडणुकीनंतर स्कोअरकार्ड इंडिया-1 आणि भाजप-0 असे असेल,” असेही राघव यांनी सांगितले.
महायुतीतील जागावाटपावर प्रतिक्रिया देताना राघव चढ्ढा म्हणाले की, आता कशावरही भाष्य करणे योग्य नाही. इंडिया युती म्हणजे अशी युती आहे ज्यामध्ये देशातील विविध पक्षांनी आपले वैयक्तिक हित बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला, देशहिताचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज जागावाटपावर भाष्य करणे योग्य नाही.