विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर दिलेला निकाल कसा चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी ठाकरे गटाने आज महापत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या पत्रकार परिषदेला जनता न्यायालय असे नाव देण्यात आले होते. यामध्ये कायद्याची बाजू मांडताना वकील असीम सरोदे यांनी या प्रकरणाच्या वेळी असणाऱ्या तत्कालीन राज्यपालांचा उल्लेख फालतू असा केला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले.
दरम्यान, जनता न्यायालय असे नाव देण्यात आलेल्या या महापत्रकार परिषदेमध्ये सर्व घटनाक्रम, तसेच पक्षांतर बंदी कायद्यावर बोलताना ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यात ते म्हणाले, ”घटनेचे पद असलेल्या राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तीने लोकशाही मार्गाने स्थापन झालेले सरकार उलटवून टाकण्यात सहभाग घेणे या विषयावर न्यायालयाने देखील दुःख व्यक्त केले आहे. या निर्णयामध्ये आणखी एक घटक महत्वाचा आहे किंवा तसे पाहिले तर फालतू माणूस आहे पण महत्वाचा. म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला. ते म्हणजे आपले राज्यपाल. ”