विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकल दिला आहे. या निर्णयामध्ये त्यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले आहे. तसेच भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना योग्यपणे पोहोचला नसल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या देखील आमदारांना पात्र ठरवले आहे. ठाकरे गटाने या निकालावर टीका केली आहे. तसेच हा निर्णय मान्य नसल्याचे सांगत त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्ट २२ जानेवारी रोजी सुनावणी घेणार आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी जवळपास दीड वर्षे चालली. अखेर १० जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. मात्र हा निकाल मान्य नसल्याचे सांगत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्याचप्रमाणे आम्ही सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली अस्लयचे शिवसेना नेते अनिल परब व ठाकरे गटाचे म्हणणे आहे. हे सगळे पुरावे जनतेसमोर मांडण्यासाठी काल त्यांनी जनता न्यायालय म्हणजेच महापत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांनी सर्व आवश्यक पुरावे निवडणूक आयोगाला दिले आहेत असे सांगितले. वकील असीम सरोदे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
राहुल नार्वेकर आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, ”गेले पाच ते सहा दिवस जे निकालाबाबत आरोप केले जात आहेत, त्यावर खुलासा करण्याचा प्रयत्न मी करत आहे. मी निकाल देता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही असे ते म्हणत आहेत . मात्र कोर्टाच्या आदेशाबाहेर जाऊन मी कोणता निर्णय घेतला हे त्यांनी सांगितले नाही. मला वाटले माझ्याकडून काही राहिले असेल तर त्यावर बोलले जाईल. मात्र त्यांनी राज्यपालांना फालतू म्हणणे, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट असा सांविधानिक संस्थाविषयी चुकीचे शब्द वापरले. अनिल परब सातत्याने एक पत्र माध्यमांसमोर दाखवतात, मात्र त्यात काय लिहिले आहे हे ते दाखवत नाहीत. कारण सुधारित घटनेबाबत त्या पत्रात उल्लेख करण्यात आलेल नाही आहे.” तसेच मी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच निकाल दिला आहे असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.