शिवसेना आमदारांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानभवनात सुनावणी सुरू आहे. आता पुढील सुनावणी २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. मात्र राष्ट्रवादी आमदारांच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर शक्यता आहे. कारण विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. दोन्ही गटाची संमती घेऊन विधीमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. नव्या वेळापत्रकाबाबत सुनावणी दरम्यान चर्चा झाली. दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल,असे अध्यक्षांचे मत आहे.
कसे आहे नवे वेळापत्रक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानभवनातील आजची सुनावणी संपली. दरम्यान नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार आता पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. 23 आणि 24 जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी होणार आहे. 25 जानेवारीला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यापुढे दोन्ही गटांकडून लेखी कागदपत्रे सादर केली जातील. 29 आणि 30 जानेवारीला दोन्ही गट आपली अंतिम बाजू मांडतील. 31 जानेवारीला सुनावणी पूर्ण होईल. त्यापुढे आठ ते दहा दिवसांत अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
31 जानेवारीनंतर 10-15 दिवसांत माझा निर्णय देईल : विधानसभा अध्यक्ष
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील, तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. त्यानुसार नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार मला सगळ्यांचं म्हणणं 31 जानेवारीपर्यंत ऐकून घ्यावे लागणार आहे. 31 जानेवारीला सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर 10-15 दिवसांत माझा निर्णय मी देईन. 23 किंवा 24 तारखेला आपण दोन्ही बाजू ऐकून घेणार आहे. 25 तारखेला आपण उलट तपासणी (क्रॉस विटनेस) करणार आहे. 31 तारखेला आपण ही सुनावणी पूर्ण करू. चार दिवस तयारीला दिले जातील.
काय झाले आजच्या सुनावणीत
शरद पवार भाकरी फिरवण्याचा उल्लेख करत होते. याचा अर्थ पक्षात नाराजी होती, असे अनिल पाटील म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, अनिल पाटील २०१८ ला आमच्या पक्षात आले आहेत. त्यामुळे भाकरी फिरवण्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही. कारण पक्ष कसा चालतो हे त्यांना माहित नाही. त्यांना भाजपाने तिकीट नाकारलं त्यानंतर ते पक्षात आले. दरम्यान अनिल पाटील यांच्या विरोधात आमच्याकडे काही नवीन कागदपत्रे आहेत, ते आम्ही सुनावणी दरम्यान सादर करू. अजित पवार यांच्या गटाने वेळ वाढवून मागितला आहे. वकिलांनी त्याला विरोध केला होता मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांचा निर्णय घेतला आणि 23 तारखेला मुख्य सुनावणी ठेवली आहे. आज माझी साक्ष झाली नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रामुळे वाद होण्याची शक्यता
अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे यांनी एक प्रतिज्ञापत्र विधिमंडळात सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे. शरद पवार कुठल्याही नेत्याचा ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे.