अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात आज राम लल्लाच्या मूर्तीचे अनावरण झाल्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भव्य कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांना संबोधित केले आणि सांगितले की आता देशातील प्रत्येक गाव आणि शहर ‘अयोध्याधाम’ बनले असून रामराज्याची सुरवात झाली आहे.
“माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत. मी भावनांनी भारावून गेलो आहे आणि मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना असेच वाटत असेल. आज या शुभ प्रसंगी, “प्रत्येकाच्या मनात भगवान राम आहे, आणि प्रत्येकाचे डोळे आनंद आणि समाधानाच्या अश्रूंनी भरले आहेत. हा भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. तसेच ही ‘रामराज्या’ची सुरुवात आहे. आपण त्रेतायुगात प्रवेश केल्याचे दिसते,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी हा दिवस प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेल्या दीर्घ संघर्षाचे स्मरण केले.
ते म्हणाले, “श्री रामजन्मभूमी ही कदाचित पहिलीच अनोखी घटना आहे जिथे त्यांच्याच देशातील बहुसंख्य समाजाला त्यांच्याच देवतेच्या जन्मस्थानी मंदिर बांधण्यासाठी इतक्या पातळ्यांवर लढा द्यावा लागला.”मात्र आता अयोध्या गोळ्यांच्या आवाजाने नव्हे तर भगवान रामाच्या नावाने गुंजेल, असेही म्हणाले आहेत.
“आता अयोध्येतील रस्ते बंदुकीच्या गोळ्यांनी गुंजणार नाहीत. कर्फ्यू नसेल.आता इथे दीपोत्सव आणि रामोत्सव होईल.श्री रामाचे नाव ‘संकीर्तन’ रस्त्यावर गुंजेल कारण इथे रामलल्लाची स्थापना झाल्याची घोषणा आज झाली आहे.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आज या लढ्यात खर्ची पडलेल्या कारसेवकांच्या आत्म्याला आनंद वाटत असेल , कारण ज्या जागेसाठी संकल्प करण्यात आला त्याच ठिकाणी मंदिर बांधले गेले आहे.
“या कार्यक्रमाने संपूर्ण देश आनंदित झाला आहे आणि या पिढीला मोठे नशीब आहे की ते या भव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होऊ शकले. सध्या जगाचे लक्ष अयोध्येकडे आहे आणि प्रत्येकाला येथे यायचे आहे,” असे मुख्यमंत्री योगी म्हणाले आहेत. .
श्री रामजन्मभूमी मंदिरात विराजमान श्रीरामाच्या मूर्तीचे बालस्वरूप प्रत्येक सनातन आस्तिकाच्या जीवनात धर्माचे पालन करण्याचे स्मरण देत राहील ” असेही ते पुढे म्हणाले आहेत.