आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण केले. तसेच गर्भगृहामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा देखील केली. १२ वाजून २९ मिनिटांनी ही प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. तसेच यावेळी मोदींनी राममंदिराच्या निर्मितीसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या कारागिरांवर पुष्पवर्षाव करत त्यांच्ये आभार मानले. पंतप्रधान मोदींनी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केलेला पाहायला मिळाला.
दरम्यान, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदीं आपल्या भाषणादरम्यान म्हणाले, ”हे शुभ कार्य आम्ही गेली अनेक वर्षे करू शकलो यासाठी मला प्रभू श्रीरामाची क्षमा मागायची आहे. राम मंदिर बांधले तर देशातील वातावरण बिघडेल असे काही जणांचे म्हणणे होते. मात्र असे म्हणणारे लोकं परिपक्व समाजामध्ये गणले जात नाहीत. राम आग नव्हे तर ऊर्जा आहे. मला खूप काही बोलायचे आहे, मात्र माझा कंठ दाटून आला आहे. आपले राम आले आहेत. आता ते तंबूत नाही तर आपल्या भव्य मंदिरात राहतील.”
उपस्थितांना संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिराच्या निर्मितीसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व कारागिरांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या अपार कष्टामुळे हे भव्य आणि दिव्य राम मंदिर आज उभे राहिले आहे. त्या सर्वांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पवर्षाव करत सर्वांचे आभार मानले. तसेच त्यांनी निमंत्रित साधू, संत, महंत आणि व्हीआयपी मान्यवरांना देखील अभिवादन केले.