लोकसभेच्या जागावाटपावरून मविआने दिलेल्या अधिकृत आमंत्रणावरून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तसेच नाना पटोले यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाला असून त्यांना इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीसंबंधी निर्णय प्रक्रियेमध्ये कोणतेही अधिकार नसताना त्यांच्या सहीने वंचितला बैठकीसाठी कसे काय आमंत्रण देण्यात आले असा रोखठोक प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे .
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठीच्या आज होणाऱ्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रण देण्यात आले होते.त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नावाच्या सह्या होत्या हे अधिकृत आमंत्रण मिळाल्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित करत माविआच्या नेत्यांवर थेट टीका केली आहे.
काँग्रेस हायकमांडकडून तुम्हाला आघाडी करण्याचे किंवा युती करण्याचे महाराष्ट्रात अधिकार दिले आहेत का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोले यांना विचारला आहे. एकीकडे काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी 23 जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की निवडणुकांची घोषणा झाल्यावर वंचितला आघाडीत समाविष्ट होण्यासाठी चर्चा करू. तर दुसरीकडे आजची तुमची ही कृती करून माईंडगेम खेळत आहात का?असा प्रश्न आंबेडकरांनी नाना पटोले यांना विचारला आहे. तसेच मविआ आणि इंडिया आघाडीमध्ये वंचितला समाविष्ठ करण्याचा निर्णय घेण्याचे सर्वोत्तपरी अधिकार तुम्हाला नाहीत.असे ही त्यांना बजावले आहे.
मात्र महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून निमंत्रण आल्यास आम्ही जरूर बैठकीस उपस्थित राहू असे उत्तर आंबेडकरांनी दिले आहे.