कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आज भाजपमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.जगदीश शेट्टर यांनी दिल्लीतील आज भाजप मुख्यालयात माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या एक दिवस आधी त्यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्षांर्गत कारणामुळे 68 वर्षीय शेट्टर हे भाजपपासून वेगळे झाले होते मात्र एका वर्षाच्या आत ते भाजपमध्ये पुन्हा परत आले आहेत.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जगदीश शेट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाने मला यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काही कारणांमुळे मी काँग्रेसमध्ये गेलो असलो तरी मात्र गेल्या 8-9 महिन्यांत खूप चर्चा झाल्या. यावेळी भाजपमधील पक्षश्रेष्ठी मला पक्षात परत येण्यास सांगत होते.
जगदीश शेट्टर पुढे म्हणाले, बीएस येडियुरप्पा आणि विजयेंद्र यांनाही मला पुन्हा भाजपमध्ये पाहायचे होते. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे यासाठी मी पुन्हा भाजपचा भाग बनत आहे.
जगजीश शेट्टर यांच्या जाण्यामुळे काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. उत्तर कर्नाटक मध्ये काँग्रेसची स्थिती काहीशी कमकुवत आहे.विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शेट्टर यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवताना पराभव पत्करावा लागला होता.