केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. निवडणूक असल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्र सरकारने केलेली चांगली धोरणे आणि काम यामुळे सलग तिसऱ्यांदा भाजपाला सत्तेत परत येण्यास मदत करेल अशी अशा सीतारमण यांनी व्यक्त केली. लोकसभेला संबोधित करताना, केंद्रीय अर्थमंत्री आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या, ”आमच्या तरुणांना देशाबद्दल, वर्तमानाबद्दल अभिमान आहे आणि उज्वल भविष्यासाठी आशा आणि विश्वास आहे. आम्हाला आशा आहे की, आमचे सरकार चांगल्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा निवडून येईल.”
निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या, आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. ”सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये आमच्या सरकारने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या दृष्टिकोनाला मजबूत केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अंतरिम अर्थसंकल्प २०२४ सादर करण्यास मंजुरी दिली. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा सहावा आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणूक होऊन नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हा अंतरिम अर्थसंकल्प आर्थिक गरजा पूर्ण करेल. दरम्यान नवीन आणि पूर्ण अर्थसंकल्प नवीन सरकार आल्यानंतर सादर केला जाईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली.