उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. आपसांतील वैमनस्य आणि जमिनीचा वाद यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.
या गोळीबार प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधक आक्रमक झाले आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये गुंडराज सुरू असून गँगवॉर रस्त्यावर आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर पोलिसांसमोरच गोळीबार होत असेल तर देवेंद्र फडणवीसांना राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शाहु फुलेंच्या महाराष्ट्रात गँगवॉर होत असेल तर हे दुर्दैवी आहे. मी हा प्रश्न संसदेत मांडणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागणार आहे.
महाराष्ट्र भरडला जात आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हक्क मिळवून देतील. पण दिवसा ढवळ्या भांडणे होतात. आमदारांची हिम्मत तरी कशी होते करण्याची? फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करणार का? तसेच पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडराज आहे. जनतेने विश्वास तरी कुणावर ठेवायचा. एवढी यांना सत्तेची मस्ती आहे का?, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.