हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडबरोबरची ही दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे.
विशाखापट्टणम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या डावात रोहित शर्मा १३ धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वी जैस्वाललाही केवळ १७ धावा करता आल्या. त्याचवेळी श्रेयस अय्यर २९ आणि रजत पाटीदार ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.मात्र शुभमन गिलने शतकी खेळी करत डाव सावरल्याचे दिसून आले आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली आहे . शुभमन गिल गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे, पण संघाला त्याची गरज असताना त्याने मोठी खेळी खेळली आहे. विशेष बाब म्हणजे शुभमन गिलने ११ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कसोटी फॉर्मेटमध्ये शतक झळकावले आहे.
शुबमन गिलने संयमाने फलंदाजी करत १३२ चेंडूत शतक झळकावले आणि भारताचा दुसरा डाव सावरला आहे.त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले.त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवशी लंचनंतर 300 धावांची आघाडी घेतलेली दिसून आली आहे.
आता चहापानासाठी खेळ थांबलेला असून टीम इंडियाने महत्वाचे खेळाडू गमावूनही ३७० धावांची आघाडी घेतलेली दिसून आली आहे.