पुण्यातील ललित कला केंद्रात रामकथा अत्यंत विकृत स्वरूपात सादर केली जात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्याचा जोरदार निषेध करत तो नाट्यप्रयोग बंद पाडला. रंगमंचावर लोकोत्तर व्यक्तिरेखा सादर करणारे कलाकार रंगमंचाच्या मागे कसे वागतात, असा काहीसा या नाटकाचा विषय होता. पण म्हणून सीतेचं पात्र वठवणार्या पुरुष नटाच्या हाती सीतेच्या वेषात असताना सिगरेट दाखवणं, हे कोणत्या प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं? तसं पाहिलं तर आपल्या सगळ्याच लोककला लोक आणि अभिजात यांचा मनोरम संगम घडवतात. मग जे लोककलांना दिसतं ते या शहरातल्या तथाकथित सुशिक्षितांना का दिसू नये?
मला सगळ्या लोककलांमधला एक समान दुवा वाटतो, तो म्हणजे त्यांच्यामधली ग्रामीण बोली आणि गोडी! नमन ही तर अस्सल ग्रामीण बाज जपणारी लोककला. इथेही झांज वाजवत एक जण रामायण- महाभारतातली एखादी कथा कीर्तनकाराच्याच प्रासादिक पद्धतीने, पण गाण्यामध्ये सांगत असतो. बाजूचे सहकारी मृदुंग, टाळ यांच्या साथीने कथा उत्तरोत्तर फुलवत नेतात. इथेही केवळ स्मरणशक्ती आणि उत्स्फूर्तता! स्त्रीवेषातला एखादा पुरुष कौसल्या झालेला असतो आणि तान्ह्या रामाला झोपवताना ‘मनमोहना, दशरथनंदना, बाळा जो जो रे’ असं पुरुषी आवाजात आळवत असतो, पण फार गोड वाटतं ते कानाला!
▪️कारण यातले उच्चार आपल्याला लोकसंस्कृतीचं मनोहारी दर्शन घडवतात. इथे जो जो मधला ‘जो’चा उच्चार जोश मधल्या ‘जो’ सारखा असतो, अयोध्या नगरी नसून ती ‘आयोदा’ नगरी असते; मिथिला नगरी ‘मिथुला’ असते आणि त्राटिका तर ‘ताटको’ असते! इतक्या गोड नावाची मुलगी राक्षसीण कशी असू शकते, हा प्रश्न आपल्या मनात रेंगाळत ठेवते ती ही लोककला! नमनामध्ये एखादं महत्त्वाचं सोंग आणलं जातं. चिपळूणला गेल्यावर्षी याच दिवसांत झालेल्या लोककला महोत्सवात रावणाचं आख्यान होतं. त्यात ‘आहा रे जनकराजा’ आणि ‘आहा रे लंकाधीशा’ इथपासून सुरू झालेला संवाद शेवटी ‘कपटुल्या रावणा रे कपटुल्या रावण्णा’ इथे येऊन संपतो आणि मला वाटतं, हेच लोककथेचं वैशिष्ट्य आहे. राम, रावण, कैकेयी, मंथरा …. आपल्याच मनातल्या भावभावना असतात ह्या!
▪️एकाच व्यक्तीच्या ठायी ह्या सगळ्या वृत्ती कमीअधिक प्रमाणात किंवा प्रसंगोपात् असतातच; आणि ह्यालाच लोककलांमध्ये लोकमान्यता मिळालेली दिसून येते. त्यामुळेच जितका जयघोष रामाचा, लोककथेत श्रीराम नसतो बरं, तो नुसताच राम असतो, तर, जितका जयघोष रामाचा, तेवढंच महत्त्व रावणालाही असतं. म्हणून तर रावणाची वाईट वृत्ती स्वीकारून त्यालाही ‘कपटुल्या’ ही गोड साद घालण्याएवढं मोठं मन लोकमानसाने सांभाळलेलं दिसतं! मला लोककलांमधून दिसणारा चांगल्या वाईट सगळ्याच भावनांचा स्वीकार, भावनांचा निर्मळपणा फार भावतो. समाजाची परिपूर्णता लोककलांनी सर्वार्थाने जपली आहे. आणि त्यामुळेच, रंगमंचावरच रावणावरून उतरवून टाकलेला नारळ खूप काही सांगून जातो. रावणाची एक्झिट झाली की त्याच्याएवढ्याच वेगाने नारळ उतरवणारा त्याच्यामागोमाग बॅकस्टेजला जातो, नारळाचा डोळा फोडून त्यातलं पाणी रावणाची भूमिका करणार्या नटाला देतो. दहा तोंडांचा अवजड लाकडी मुखवटा सांभाळत रावण साकारणं ऐर्यागैर्याचं काम नोहे!
▪️नारळाच्या पाण्याने त्याला एनर्जी तर मिळतेच, पण त्यापेक्षाही मला फार फार आवडलं ते त्याच्यावरून नारळ उतरवणं! ‘हे रंगमंचापुरतं सोंग आहे, पण ही रावणी मानसिकता तुझ्या मनात यापुढे राहू नये, ही बाधा नाहीशी व्हावी’, हे त्या नटाला समजावून सांगणं हाच तर यामागचा उद्देश नसेल?!
▪️आपल्या लोककला आणि लोककथांमधली निर्मळता आणि परिपक्वता जीवनकला शिकवणारी आहे विकॄतीकडे नेणारी नाही याचं लळित आता अशा केंद्रांमधून
लावायला हवं!
♦️आसावरी देशपांडे जोशी♦️
मोबाईल नंबर : 7057557508
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे