राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित दादांकडे
काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर हे चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर राज्यभरात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.तर दुसरीकडे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्याआधी खबर्दारी म्हणून अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन नाव आणि चिन्ह दुपारी ४ वाजेपर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत. ते न दिल्यास निवडणुकीत आपला पक्ष अपक्ष म्हणून ओळखला जाईल असे आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे आता शरद पवार गट कोणते नाव आणि चिन्ह आयोगाकडे देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
कालच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 2019 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. त्यांना लोकशाहीने त्यांची जागा दाखवलेली आहे. मी चपराक वैगेरे म्हणत नाही. मी अजित दादांचे अभिनंदन करतो. मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार त्यांच्या नेतृत्वात उत्तम काम करेल. बहुमताला महत्त्व आहे पण फक्त बहुमताच्या आधारावर निर्णय झाला नाही तर इतर सर्व बाबींचा विचार करून निर्णय झाला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
मनसे नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; चर्चांना उधाण
मनसे नेते संदीप देशपांडे , नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री व राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीये. या नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी पाहता या भेटीत मनसे-भाजपा युतीवर चर्चा झाली का? महायुतीत सामील होण्यासंदर्भात ही भेट झाली का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. ज्या पद्धतीने राज्यातील राजकारण सध्या फिरत आहे, त्यादृष्टीने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मनसेला महायुतीत सामील करून घेण्यासाठी सकारात्मक असल्याचे कळते आहे. याबाबत लवकरच एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मविआमध्ये येण्यासाठी अनेक पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये इनकमिंग; अनेक आमदार, खासदारांनी केला पक्षप्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये इनकमिंग होता दिसून येत आहे. admk पक्षाच्या १५ माजी आमदारांनी आणि एका माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्ष प्रवेश झाल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितिमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षात आपले स्वागत आहे असे यावेळी राजीव चंद्रशेहार यांनी म्हटले आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजपा ३७० पेक्षा अधिक तर एनडीए ४०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.