▪️माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
घरात कोलाहल माजला होता, चार-पाच वर्षांची लहानगी रमा एकदम बावरून गेली होती. समोर आई निजलेली दिसत होती पण घरात जमलेली सगळी मंडळी धायमोकलून रडत होती. हे काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. गेल्या काही दिवसांपासून आई आजारपणाने निजूनच राहायची पण यापूर्वी कोणी असं कधी रडलं नव्हतं. लहानगी रमा अनेक दिवसात आपल्या आईशी मनमोकळी बोलली नव्हती की खेळली देखील नव्हती, गेल्या बऱ्याच दिवसांत आईकडे तिने कोणता हट्टसुद्धा केला नव्हता पण निदान आई डोळे उघडून बघायची, हळू आवाजात बोलायची पण आज नेमके असे काय झाले की एवढे लोकं रडत असतानाही आई शांत होती हे बघून ती मनातून घाबरून गेली होती. काही वेळाने जमलेली मंडळी आईला घेऊन गेली, आपली आई आपल्याला पुन्हा कधीच भेटणार-दिसणार नाही हे ऐकून रमाच्या पायखालची जमीनच सरकली. मृत्यु नावाच्या शब्दाची तिला फार लहानपणीच ओळख झाली. रुख्मिणी धुत्रे यांच्या निधनाने सानुली रमा आईविना पोर म्हणून ओळखली जाऊ लागली.
कुटुंब मोठं होतं, मोठ्या बहिणीचं लग्न झालेले म्हणून मग तिच्या लहान बहीण-भावांची रमा नकळतपणे ताई झाली. अजाण वयात झालेला मोठा आघात बालसुलभ मनाला एकदम पोक्त करून टाकतो. यांचे गाव दाभोळ बंदरानजीक वंणदगाव. तेथे मत्स्यव्यवसाय हा प्रमुख व्यवसाय असल्याने रमाचे वडील भिकू धुत्रे हे उदरनिर्वाहासाठी बंदरात उतरणाऱ्या माश्यांच्या टोपल्या बाजारपर्यंत पोचविण्याचे काम करायचे. कुटुंब मोठं, उत्पनाचे साधन छोटं मग साहजिकच ओढाताण होत होती. त्यातून काटकसरीत गुजराण घडत होती. पराकोटीची गरिबी आणि प्रचंड कष्ट लहानपणापासूनच तिचे मित्र म्हणून तिच्या सोबतीला आले.
◼️एक-दोन वर्षे जातात न जातात तोच वडील भिकू धुत्रे यांचे आकस्मिक निधन झाले आणि पोरकी शब्दाची तिला ओळख झाली. पण स्वतःला सावरून ती तिच्या अनुज भावंडांची जणू आई-वडील झाली. एक एक आघात तिच्या जबाबदाऱ्या वाढवत जात होता. त्यातच मुंबईला राहणारे काका आणि मामाने लेकरांना मुंबईला नेण्याचे ठरवले आणि मग रमा व तिचे भावंडे तिचे वलंगकर काका आणि गोविंदपूरकर मामासोबत मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये दाखल झाले. आयुष्य हे अनाकलनीय असतं, कुठलं वळण कुठल्या रस्त्यावर घेऊन जाईल हे नवख्या आणि निराधार पांथस्थाला माहीत नसते.
◼️भायखळ्याच्या मार्केटमध्ये काका आणि मामाला मदत करणे सोबत लहान भावंडांची काळजी घेणे यात रमाबाईचा उगवलेला दिवस कधी मावळायचा हे कळत देखील नसे. वेळ-दिवस-वार कशाची म्हणून तिला जाणीव नव्हती, सतत काम आणि कष्ट एवढे काय तिचे विश्व. अशातच सुभेदार रामजी आंबेडकर आपला मुलगा भीमसाठी स्थळ शोधत होते, त्यांना कळाले की भायखळ्याच्या वलंगकर यांची पुतणी लग्नाची आहे. त्यांनी वलंगकर यांना आपल्या भीमसाठी बायको म्हणून रमेला रितसर मागणी घातली. दोन्ही कुटुंबांनी संमतीने लग्न ठरवले आणि केवळ नऊ वर्षाची रमा चौदा वर्षीय भीमरावांची पत्नी म्हणून इ.स. १९०६ मध्ये आंबेडकरांच्या घरात आली.
◼️त्याकाळी बालविवाह हे सर्वमान्य होते. खेळण्याच्या वयात परकर-पोलक्यातील रमा एकदम लुगड्यात येऊन सुनेच्या जबाबदारीशी व कर्तव्याशी एकरूप झाली. पोरसवदा शांत पण मिश्किल स्वभावाचा भीम आपल्या अवखळ बायकोला ‘रामु’ म्हणून हाक मारायचा तर शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या आणि साहेबी थाटात राहणाऱ्या आपल्या नवऱ्याला रमा ‘साहेब’ म्हणून हाक मारायची. आजकालची मुलंमुली ज्या वयात शिक्षणाच्या ओझ्याखाली दबलेलं जीवन जगतात त्या वयात ती दोघे बालसुलभ, व्रात्य व गमत्या स्वभावाने खरोखरचा संसार जगत होती. रमाला लहानपणापासूनच आपला नवरा इतरांपेक्षा वेगळा आहे याची जाणीव होती. तो विद्यार्जनाच्या ध्यासाने पछाडलेला आहे, पूर्वीचे लोकं तपश्चर्या करून ज्ञानी बनत हा पण त्याच मार्गावर निघालेला. गावात आणि सोयऱ्यांत सगळी तरणीताठी बापे वेगवेगळया व्यसनांच्यापायी वाया गेलेली तिथे हिच्या नवऱ्याला पुस्तकांचे व्यसन होते. नाद आणि ध्यास फक्त शिक्षणाचा. ज्ञानार्जनासाठी त्याने सगळंच बाजूला ठेवलं होतं, याचंच तिला कोण कौतुक.
◼️रमा पूर्णपणे भीममय झालेली होती. आपल्या नवऱ्याच्या ज्ञानार्जनात खंड पडू नये म्हणून ती प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती, तिला कष्टाची तशी कधीच तमा नव्हती, ते तिच्या अंगवळणी पडलेलं होतं. रामजीने पोटाच्या पोरीची माया रमाला लावली. लहानपणीच आई-वडिलांच्या छत्राला पारखी झालेल्या रमेला रामजींसारखा पित्याची माया देणारा सासरा भेटला आणि तिला जणू स्वर्गच गावला. रमा दुःख आणि कष्ट आपल्या नशिबातच घेऊन आली होती. नकळत्या वयापासूनच जिम्मेदारी हि जणू आभूषणसारखी म्हणून तिला चिकटली होती. नियतीचा खेळ न्यारा असतो, आता कुठं थोडं म्हणून सुख अंगाला लागायला लागलं होतं, लग्नाला जेमतेम सातच वर्षे झाली होती आणि रामजींचे निधन झाले. रमा परत एकदा मायेची सावली धरणाऱ्या छत्राला पारखी झाली.
◼️इ. स. १९२३ मध्ये भीम उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला तेव्हा मात्र रमा खरंच एकटी पडली. पदरी अजाणते आपत्य होती तसे मानसिक आधाराला भीमची सावत्र आई होती पण घरी निर्णय घेणारा कोणी मोठा कर्ता पुरुष नव्हता. कष्टही रमाचे आणि निर्णयही रमाचेच त्यामुळे नकळतपणे लहानवयातच पोक्तपणा आला. संसाराचा गाडा रेटण्यासाठी आणि घरच्यांच्या उदरनिर्वाहासाठी परत एकदा तिने अविरत परिश्रमाला जवळ केले. त्यातच भीमच्या सावत्र आईचे निधन झाले आणि रमा पुरती एकटी पडली. भीमचे मित्र आणि सहकारी यांनी रमाला कैकवेळा मदत देऊ केली पण आपल्या नवऱ्याच्या स्वाभिमानाला धक्का लागेल म्हणून सगळ्यांची मदत ती नम्रपणे नाकारत गेली.
◼️रमा आणि भीम यांना पाच लेकरं झाली. यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न पण दुर्दैवाने यशवंत सोडून सगळेच अल्पजीवी ठरले. मृत्यू हा मानवाच्या जीवनातला अप्रिय पण अविभाज्य घटक आहे पण म्हणून त्या मृत्यूने एखाद्या व्यक्तीला तिचे सर्वस्व हिरावून इतका त्रास द्यावा हे योग्य नव्हे. बहुतेक संकटांच्या वेळी भीम परदेशातच होता, पण त्याला हे सर्व कळाले तर त्याच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल म्हणून रमाने एकटीनेच सर्व सोसत सहन केले. दुःख बाजूला ठेवून घर चालविण्याला खुप सहनशीलता लागते त्यातच परदेशात असलेल्या आपल्या नवऱ्याला आपल्या दुःखाची, कष्टांची जाणीव होऊ न देता जगणे यासाठी खुप पराकोटीची स्थितप्रज्ञता लागते, ती सवयीने रमाला प्राप्त झाली. भोगलेल्या कठीण संकटांनी आणि एकानंतर एक अशा अप्रिय प्रसंगांनी आपोआपच तिला परिपक्व आणि प्रगल्भ बनविले. तिकडे परदेशात तिचा नवरा पुस्तकी विद्या प्राप्त करत होता आणि इकडे रमा माणसांच्या दुनियादारीत राबून जीवनाचे मूलभूत पण शाश्वत असे तत्वज्ञान शिकत होती.
◼️नवरा भीम आधी अमेरिकेला गेला परत आल्यावर बडोदा संस्थानात नोकरी करू लागला. काही दिवसांनी ती नोकरी सोडून परत लंडनला गेला. तिचा नवरा अतिउच्च विद्याविभूषित झाला एक छोटासा चौदा वर्षाचा भीम पूर्ण भारतात आणि विलायतेत भीमराव म्हणून ओळखल्या जाऊ लागला. तिच्या नवऱ्याच्या भीम ते भीमराव या प्रवासात त्याचे स्वतःचे परिश्रम, चिकाटी आणि जिद्द होतीच पण त्या सर्वांमागे खंबीरपणे एकमेव जीवनसत्व उत्प्रेरकासारखे कार्यरत होते ते म्हणजे रमाचे कष्ट, त्याग आणि सोशिकपणा.
◼️नवरा परत आल्यावर सगळे कुटुंब मुंबईत दादरच्या राजगृही राहू लागले. आताशी कुठे सुखाची हलकीशी झुळूक यायला सुरुवात झाली होती पण आयुष्यभर तिने घेतलेल्या अविरत आणि अविश्रांत कष्टामुळे तिचे शरीर क्षीण बनले. अडचणीच्या आणि संकटांच्या काळात कणखर असलेली रमा आता छोट्यामोठ्या कारणांनी आजारी पडू लागली. सतत कष्ट करणाऱ्या मनुष्याला सुख लाभत नाही हेच खरे. इतक्यावेळ प्रचंड निकराने दाबून दूर ठेवलेल्या व्याधी जरा निवांतपणा मिळाला की डोके वर काढू लागतात, अगदी तसेच झाले. भीम आणि त्याच्या परिवारासाठी सतत तेवत राहणारी समई वयाच्या सदोतीसाव्या वर्षी शांत झाली. १९०६ ते १९३५ हे एकोणतीस वर्षे हा कालावधी दोन जीवांचा परीक्षा घेत होता. जीवनाची लढाई जिंकण्यासाठी त्यां दोघांचाही कस पणाला लागला. दोघांनी मिळून समाजासाठी लढायची मुख्य लढाई अजून बाकीच होती तरी आपल्या लाडक्या साहेबांना एकटं सोडून रमाने कृतार्थ भावनेने आपले जीवनकार्य संपवले.
◼️या परीक्षेच्या काळातून छोटासा अबोल पण मिश्किल स्वभावाचा भीम उर्फ तिचा साहेब हा डॉ. भीमराव आंबेडकर म्हणून बाहेर पडला तर भीमरावांच्या पाठीशी सदैव खंबीर असणारा आधारस्तंभ रमा हि भीमरावांना बाप मानणाऱ्या सर्व लेकरांची रमामाता झाली…. रमाई झाली.
▪️प्रवीण…चल्लावार▪️
सौजन्य – विश्व संवाद केंद्र ,पुणे