सध्या उत्तर प्रदेशातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते आता संसद भवनावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. हजारो शेतकरी नोएडामधील सेक्टर-15 आणि फिल्म सिटीसमोर उपस्थित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी नोएडा पोलिसांनी बॅरिकेड लावले आहेत. तसेच दिल्लीमध्ये कलम 144 देखील लावण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून शेतकरी नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. पण आता ते संसद भवनावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. तसेच संसद भवनाला घेराव घालण्याची घोषणा शेतकरी नेते सुखबीर खलिफा यांनी केली आहे.
वाढीव मोबदला मिळावा, 10 टक्के भूखंड परत करावा, स्थानिकांना रोजगार मिळावा आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. डिसेंबर 2023 मध्ये नोएडा आणि ग्रेटर नोएडा डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने जमीन अधिग्रहित केली होती. त्या बदल्यात वाढीव मोबदला मिळावा आणि भूखंड मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
वेगवेगळ्या शेतकऱ्यांना एनटीपीसीने समान मोबदला देण्याऐवजी वेगवेगळी भरपाई दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लेखी कराराची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दोन वर्षे उलटून गेली आहेत. तरीही एमएसपी हमीभावासाठी कोणताही कायदा आणला गेला नाही. त्यामुळे शेतकरी 13 फेब्रुवारी रोजी एमएसपी कायद्याच्या मागणीसाठी दिल्लीवर पुन्हा एकदा मोर्चा काढणार आहेत.