वसंतपंचमी ही शिशिरॠतुमध्ये येणारी माघ शुध्द पंचमी होय. या पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंतऋतूला ऋतूंचा राजा मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतात साधारणत: मकरसंक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरु होतानाच्या काळात येणारा हा सण आहे.
ही पंचमीची पूजा पूर्व भारत, वायव्य बांगलादेश, नेपाळ आणि इतरही अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी पिवळे कपडे घालतात.
वसंतत्रऋतू आला की शेतात मोहरीची फुले सोन्यासारखी चमकू लागतात जव आणि गहू गहू या पिकांना बहर येतो. आंब्याच्या झाडांना मोहोर येतो .रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे उडताना दिसतात.
या वसंतऋतूचे, स्वागत करण्यासाठी, माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी जो मोठा उत्सव आयोजित केला जातो तोच हा वसंतपंचमीचा उत्सव होय.
पंढरपुरात पांडुरंगाला वसंत पंचमीच्या दिवशी पांढरे धोतर, पांढरा अंगरखा, पांढरे उपरणे आणि मस्तकी पांढरे पागोटे घालतात. रुक्मिणीमातेला आणि इतर देवांनाही पांढरा पोशाख करतात मंडपात फुलांची आकर्षक आरास केली जाते.
_ अरुंधती देशपांडे, तळेगाव दाभाडे
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत