ओम सूर्याय नमः
सर्वसृष्टीचा जीवनदाता, तेजाचा अधिपती, आरोग्यदाता अशा या सूर्यनारायणाचे पृथ्वीवरील सर्व सजीवांवर अनंत अपरिमित उपकार आहेत. रथसप्तमीला या सूर्य देवाची उपासना, पूजा केली जाते. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमी हा रथसप्तमीचा दिवस.आपणा सर्वांना माहित आहे की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती परिक्रमा करते. या मुळे तयार होणाऱ्या स्थितीमुळे वर्षाचे दोन भाग पडतात, उत्तरायण व दक्षिणायन. सूर्य जेव्हा कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे वाटचाल करतो तेव्हा म्हणजे उत्तरायणात रथसप्तमी येते .
वसंत ऋतुची ही आनंददायी सुरुवात असते. सप्तमीच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ स्वच्छ पाटावर सात अश्व जोडलेला सूर्य नारायणाचा रथ रांगोळीने काढतात . हळदीकुंकू व लाल फुलांनी त्याची पूजा केली जाते. मातीच्या सुगड्यात तांदूळ आणि दूध घालून ते उतू जाईपर्यंत निखाऱ्यावर शिजवतात.
काही साधक माघ प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत व्रत ठेवतात उपवास करतात आणि या तांदूळ खिरीवरच उपवास सोडतात.पारमार्थिक वाटचालीसाठी साधकांच्या साधनेचा हा उत्तम काळ असतो.
या सप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. कोवळ्या सूर्यकिरणांचे स्नान अत्यंत आरोग्यदायी व डी जीवनसत्व प्रदान करणारे एकमेव नैसर्गिक साधन आहे . सूर्यनारायणावर या विश्वाचे जीवन चक्र अन्न सर्वच अवलंबून आहे .
ओम आदित्य विद महे । सहस्त्र किरणाय धीमी। तन्नो सूर्य प्रचोदयात ॥
सौ. विनया वि. भांगे
पिंपळे सौदागर
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत