दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वारंवार आपले सरकार पडण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप भाजपावर करतात. दरम्यान या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत विश्वास प्रस्ताव मांडला आहे. उद्या दिल्ली विधानसभेत या विश्वास प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. विधानसभेचे कामकाज हे उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सध्या दिल्ली विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या सातव्या विधानसभेचे हे पाचवे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. काल सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २१ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान यावेळी अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आम आदमी पार्टीचे सरकार पाडण्याचा डाव आखत असून, आमच्या काही आमदारांना सरकार पाडण्यासाठी लाच देण्यात आली होती, असा आरोप केला.
”नुकतेच त्यांनी आमच्या ७ आमदारांशी संपर्क केला आहे व काही दिवसांतच केजरीवालांना अटक करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही आमदार फोडू. २१ आमदारांशी आमचा संपर्क झाला आहे. इतरांशी बोलणी सुरू आहेत. ”आम्ही दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार पाडू. तुम्ही पण या, आम्ही तुम्हाला २५ कोटी रुपये देऊ आणि भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवायला देऊ”, असे केजरीवाल यांनी एक्स वर पोस्ट केले.
दरम्यान, केजरीवाल आणि भाजपामधील वाद हा वाढताना दिसून येत आहे. दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी भाजपा ऑपरेशन लोटस करत असल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपा विरुद्ध आम आदमी पार्टी हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.