संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
गावोगावी जाऊन, हातात झाडू घेऊन सर्व गाव स्वच्छ झाडून काढायचे, नंतर गाडग्याच्या खापरामध्ये पाणी व भिक्षा मागून खायची आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करायचे, हा संत गाडगे महाराजांचा वर्षानुवर्षे नित्यक्रम होता.
“सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगेबाबांना पहावे कीर्तनात” असे आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल म्हंटले आहे.
संत गाडगेबाबांनी समाजात निर्माण झालेल्या अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा व अज्ञान यावर कीर्तनाच्या माध्यमातून आसूड ओढले. यांत अडकलेल्या सर्व सामान्य जनतेला जागृत करण्याचे काम केले.
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या भजनाचा गजर सर्वदूर पसरू लागला. लोक संत गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकायला गर्दी करू लागले. लहानपणापासून समाजाची परिस्थिती पहात आलेल्या व प्रत्यक्षपणे ही परिस्थिती स्वतः अनुभवलेल्या गाडगे महाराजांनी समाजाला, सावकाराचे कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, चोरी करू नका, स्पृश्य-अस्पृश्यता यासारखे भेदाभेद पाळू नका. देवाच्या नावाने निष्पाप प्राण्यांची हत्या करू नका असा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून दिला.
अस्वच्छता त्यांना आवडत नसे. त्यामुळे प्रत्यक्ष झाडू हातात घेऊन त्यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने ग्रामस्वच्छता अभियान राबविले. प्रामाणिकपणा व प्राणीमात्रांविषयी भूतदया यावर भर दिला. “देव दगड-धोंडयात नसून तो प्रत्यक्ष माणसात आहे,” ही शिकवण त्यांनी समाजाला दिली.
गाडगे महाराज यांनी समाजप्रबोधनाबरोबरच विविधतीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धर्मशाळा, नद्यांचे घाट, आश्रमशाळा, पाणपोयी, गोशाळा उभ्या केल्या,
सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शाळा-महाविद्यालये काढली, अंध-अपंगांसाठी वसतिगृह बांधले. त्यांनी अशा अनेक संस्था उभ्या केल्या. या संस्थांमध्ये आपल्या कुटुंबातील एकाही सदस्याला सदस्य केले नाही.
त्यांचे हे कार्य पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरही प्रभावित झाले. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात संत गाडगे महाराजांचा सल्ला घेतला व तो त्यांनी पुढे आमलात आणला.
अशा या महान सामाजिक क्रांतिकारी लोकोत्तर संताचे कार्य आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांचे चरित्र प्रत्येकाने वाचलेच पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे.
संजय कीर्तने, नाशिक.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे