काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा काँग्रेसला झटका बसला आहे. नांदेड-वाघाळा महापालिकेतील मागील वेळेस निवडून आलेल्या काँग्रेसच्या 55 निर्वाचित आणि स्विकृत नगरसेवकांनी शनिवारी (24 फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. या 55 नगरसेवकांनी शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या 55 नगरसेवकांचे भाजपमध्ये माजी आमदार अमर राजूरकर आणि इतरांनी स्वागत केले. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड-वाघाळा महापालिकेच्या 55 माजी नगरसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा दिला होता. तसेच अशोक चव्हाण यांचे नांदेडला आगमन झाल्यानंतर काल अनेक माजी नगरसेवकांनी चव्हाणांची भेट घेतली. त्यानंतर या सर्व माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
याबाबतची एक पोस्ट अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माजी नगरसेवकांचे भाजपमध्ये स्वागत केले.
https://twitter.com/AshokChavan1958/status/1761306299625529569
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांशी आज विस्तृत चर्चा झाली. सुमारे 55 हून अधिक माजी निर्वाचित नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत करतो, असे अशोक चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले आहे.