ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यामागील चौकशीचा फेरा अजूनही संपलेला दिसत नाहीये. कारण आज पुन्हा एकदा आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. जानेवारी महिन्यात एसीबीने आमदार राजन साळवी यांच्या घरावर बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात छापेमारी केली होती. अवैध मालमत्ता प्रकरणी एसीबीने तक्रार दिल्यानंतर राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी राजन साळवी यांची रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे.
राजन साळवी, त्यांची पत्नी, मुलगा यांची आधीदेखील एसीबी चौकशी झाली आहे. दरम्यान राजन साळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश कोर्टाने साळवी यांना दिले आहेत. त्याप्रमाणे साळवी आणि त्यांचे कुटुंबीय चौकशीला सहकार्य करणार आहेत.
जानेवारी महिन्यात एसीबीने राजन साळवी यांच्या रत्नागिरी, राजापूर येथील कार्यालय आणि निवासस्थानावर छापेमारी केली होती. अवैध मालमत्ता असल्याप्रकरणी राजन साळवी हे एसीबी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. राजन साळवी हे ठाकरे गटाचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अवैध मालमत्तेप्रकरणी त्यांची आतापर्यंत ७ ते ८ वेळा चौकशी झाली आहे. मात्र कितीही चौकशी केली , अगदी अटक केली तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असे राजन साळवी यांनी स्पष्ट केले आहे.