महान क्रांतिकारक आणि समाज सुधारक (१८२४-१८८३)
◆स्वामी दयानंद सरस्वती हे एक महान क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते. भारतीय समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी वैदिक परंपरेची उच्च मूल्ये आणि त्या काळची गरज लक्षात घेऊन आर्य समाजाची स्थापना केली. ‘भारत भारतीयांसाठी’ या दृष्टिकोनातून १८७६ मध्ये त्यांनी ‘स्वराज्य’ ही संकल्पना प्रथम मांडली. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि तत्कालिन स्वातंत्र्यसैनिकांनी त्याचा अवलंब केला. वेदांमध्ये उपलब्ध असलेल्या अद्वितीय ज्ञान सर्वांना मिळावे आणि मानवी जीवन सुखी व जगण्यालायक व्हावे यासाठी वैदिक विचारसरणी पुनरुज्जीवित करण्याकरिता स्वामी दयानंद यांनी कार्य केले.
◆ गोरक्षण चळवळीतील प्रमुख वक्त्यांपैकी ते एक होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी १८८१ मध्ये ‘गोकुरुणानिधी’ (गायसाठी कृपा करणारा दयेचा सागर) प्रकाशित केले. आर्य समाजाने तत्कालिन समाजरचनेतील खालच्या जातींना इस्लाम धर्मात जाण्यापासून रोखण्यासाठी शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली होती.
◆ दयानंद सरस्वती यांचा जन्म दि. १२ फेब्रुवारी १८२४ रोजी गुजरातमधील टंकारा येथे कर्पूरी लालजी तिवारी आणि यशोदाबाई यांच्यापोटी झाला. बालपणीचे त्यांचे नाव मूलशंकर होते. त्यांचे संपन्न व प्रभावशाली ब्राह्मण कुटुंब भगवान शिवाचे परमभक्त होते. कौटुंबिक वातावरण अतिशय धार्मिक असल्यामुळे मूलशंकर यांना धार्मिक विधी, धार्मिकता आणि पवित्रता, अगदी लहानपणापासूनच उपवास करण्याचे महत्त्व शिकवले गेले होते. ते आठ वर्षांचे असताना त्यांची मुंज झाली. लहान बहिण आणि काकांचा कॉलरामुळे मृत्यू झाल्याने मूलशंकर जीवन आणि मृत्यू याचा विचार करू लागला. त्याचे प्रश्न ऐकून त्याच्या पालकांना काळजी वाटू लागली होती. त्यामुळे किशोरवयातच त्यांनी त्याचा साखरपुडा केला. पण विवाहित जीवन आपल्यासाठी नसल्याचे जाणून असलेला मूलशंकर १८४६ मध्ये घरातून पळून गेला. त्या अगोदरपासूनच म्हणजे १८४५ पासून १८६९ पर्यंत सत्याच्या शोधात तपस्वी बनून तो भ्रमंती करत होता.
◆ भौतिक जीवनाचा त्याग करून तो स्वावलंबी आयुष्य जगू लागला. आध्यात्मिक जीवनामध्ये स्वत: ला झोकून देण्यासाठी त्याने जंगलात वास्तव्य केले, हिमालय आणि तीर्थक्षेत्रांमध्ये वेळ व्यतीत केला. या वर्षांमध्ये त्याने योगाचे विविध आत्मसात प्रकार केले आणि विरजानंद दांडीशनमच्या एका धार्मिक शिक्षकाचे शिष्यत्व स्वीकारले. आपले संपूर्ण जीवन हिंदू धर्माच्या, वेदांच्या पुनर्स्थापनेसाठी वेचण्याचे वचन स्वामी दयानंद सरस्वती यांनी विरजानंद यांना दिले.
◆ दि. ७ एप्रिल १८७५ रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाने पूजाअर्चा, तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान, प्राण्यांचा बळी देणे, पौरोहित्य प्रायोजित करणे इत्यादी विधींचा विरोध कोला.
भारतीय मानसातील आध्यात्मिक पुनर्रचनेचा केवळ पुरस्कार न करता आर्य समाजाने विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. त्यामध्ये विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण यांचा समावेश होतो. १८८० च्या दशकात आर्य समाजाने विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ कार्यक्रम सुरू केले. महर्षि दयानंद यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित केले आणि बालविवाहाला विरोध दर्शविला. हिंदू धर्मात निर्माण झालेल्या विकृतींसाठी हिंदू समाजात त्यांच्या पारंपारिक वैदिक ज्ञानाचा असलेला अभाव हा मुख्यत्वे जबाबदार आहेस याची खात्री दयानंदांना होती. आर्य आपल्या अनुयायांना वेदांचे ज्ञान देण्यासाठी त्यांनी अनेक गुरूकुलांची स्थापना केली. १८८३ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज ट्रस्ट आणि मॅनेजमेंट सोसायटीची स्थापना केली. दि. १ जून १८८६ रोजी लाहोर येथे प्रथम डीएव्ही हायस्कूलची स्थापना झाली.
◆ महर्षि दयानंद सरस्वती यांनी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म तसेच जैन, बौद्ध आणि शीख धर्म यासारख्या भारतीय धर्मांचे तार्किक, वैज्ञानिक आणि टीकात्मक परीक्षण केले. त्यांच्या शिकवणुकीतून सार्वभौमत्वाचा संदेश मिळाला.
◆ दयानंद सरस्वती यांची सामाजिक प्रश्न आणि श्रद्धा यांच्याबद्दलची प्रखर भूमिका आणि ठोस वृत्ती यामुळे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले होते. सन १८८३ मध्ये दिवाळीच्या निमित्ताने जोधपूरचे महाराजा जसवंतसिंग (द्वितीय) यांनी महर्षि दयानंदांना राजवाड्यात बोलावले होते. तेव्हा त्यांनी राजाला सुखासीन जीवन सोडून धर्म मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा महाराजांच्या दरबारातील नृत्यांगनेला महर्षी दयानंद यांचा राग आला आणि तिने राजवाड्यातील स्वयंपाक्याला हाताशी धरून महर्षींच्या दुधात काचेचा तुकडा टाकला. त्यामुळे महर्षीना अत्यंत वेदनादायक स्थितीत मरण आले. दीपावलीच्या दिवशी ३० ऑक्टोबर १८८३ रोजी अजमेरमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
◆ महर्षी दयानंद आणि आर्य समाज यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कधीच थेट सहभाग घेतला नाही. परंतु लाला लाजपत राय, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, मॅडम कामा, राम प्रसाद बिस्मिल, न्या. महादेव गोविंद रानडे, मदनलाल धिंग्रा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव होता. महान क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांचे शिक्षण आर्य समाजाच्या लाहोरमधील डीएव्ही शाळेतच झाले होते.
◆ दयानंद सरस्वती यांनी एकूण ६० हून अधिक ग्रंथ लिहिले, ज्यात सहा वेदांगांचे १६ खंड स्पष्टीकरण, पाणिनीचे व्याकरण ‘अष्टाध्यायी’ वर टीका (अपूर्ण), नैतिकता आणि नीतिशास्त्र, वैदिकविधी आणि संस्कार यावर छोटया पुस्तिका, आणि प्रतिस्पर्धी सिद्धांतावरील अनेक लहान पुस्तके (जसे की) अद्वैत वेदांत, इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म इ.चा समावेश आहे. सत्यार्थ प्रकाश, सत्यार्थ भूमिका, संस्कारविधी, ऋग्वेदादी भाष्य भूमिका, ऋग्वेद भैष्यम (७/६१/२) आणि यजुर्वेद भाष्यम हे त्यांचे काही प्रमुख ग्रंथ आहेत
◆ शब्दांकन – रुपाली भुसारी ◆
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे