काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार आपल्या सहकारी आमदार आणि खासदारांसह महायुतीमध्ये सत्तेत सामील झाले. त्यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवाडो काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी देखील अजित पवारांचा पक्षच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय दिला आहे. आता अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी तयारीला लागली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसह विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे समजते आहे.
अरुणाचल प्रदेशच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार आणि प्रफुल पटेलांची भेट घेतली. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्याबाहेर निवडणूक लढविणार आहे. भाजपाने अरुणाचल प्रदेशमधून किरण रिजिजू यांना उमेदवारी दिली आहे. तरी देखील लोकसभेसाठी अजित पवारांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याचे समजते आहे.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसह विधानसभा लढविण्याची तयारी करत आहे. मात्र किरण रिजिजू यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अजित पवार गट हा अरुणाचल प्रदेशमधील विधानसभेच्या निम्म्या जागा लढविण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आणि निवडणूक आयोगाने निर्णय अजित पवारांच्या बाजूने दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.