आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. तर यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम येथे पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय क्रिएटर्ससोबत भारतातील 23 क्रिएटर्सना हा पुरस्कार प्रदान केला. यामध्ये मैथिली ठाकूर, जया किशोरी यांच्यासह अनेक तरुण इन्फ्लुएंसरना राष्ट्रीय निर्माता पुरस्काराने सन्मानित केले.
पंतप्रधान मोदींनी लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरला ‘कल्चरल अँबेसिडर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. त्याचवेळी त्यांनी जया किशोरी यांना सामाजिक परिवर्तनासाठी ‘बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज’ हा पुरस्कार प्रदान केला.
पंतप्रधान मोदींनी निश्चय याला गेमिंग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार प्रदान केला. तर अंकित बैयनपुरियाला सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस क्रिएटरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पीएम मोदींनी नमन देशमुखला शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार प्रदान केला.
या पुरस्कार सोहळ्यात संबोधित करताना पंतप्रधानांनी डिजिटल निर्मात्यांना त्यांच्या कटेंटसह जागतिक प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास सांगितले. “चला ‘क्रिएट ऑन इंडिया’ चळवळ सुरू करण्यासाठी एकत्र येऊ या. भारताची गोष्ट जगासोबत शेअर करूया. असे कंटेट तयार करा ज्यामुळे तुमच्या देशाला लाईक्स मिळण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला जागतिक प्रेक्षकांशी जोडले जावे लागेल,” असे पंतप्रधान म्हणाले.
कंटेंट निर्मात्यांना ‘जागतिक मंचावर भारताचे डिजिटल राजदूत’ असे संबोधून पंतप्रधान म्हणाले, “तुम्ही जगातील कोणत्याही कोपऱ्यात एका सेकंदात पोहोचू शकता. तुम्ही स्थानिक नावीन्यपूर्ण आवाजाचे ब्रँड ॲम्बेसेडर आहात. तसेच या पुरस्कार सोहळ्याचे श्रेय या देशातील तरुणांना आणि प्रत्येक डिजिटल कंटेंट निर्मात्याला जाते”, असेही पंतप्रधान म्हणाले.
पुढे पीएम मोदी म्हणाले की, नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्सला भविष्यात महत्त्वाचे स्थान असेल. “लोक मला विचारतात माझ्या यशाचे रहस्य काय आहे. पण मी सगळ्यांना उत्तर देत नाही. कोणताही रेस्टॉरंट मालक तुम्हाला स्वयंपाकघर दाखवेल का? देवाच्या कृपेने, मला वेळेआधीच समजू शकते. म्हणूनच मी म्हणू शकतो की या पुरस्काराचे (नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स) भविष्यात महत्त्वाचे स्थान असेल.
पंतप्रधान मोदींनी सर्व निर्मात्यांचे विशेषत: पुरस्काराने सन्मानित झालेल्या महिलांचे अभिनंदन केले. “आज ज्यांना नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, मी सर्व मुलींचे अभिनंदन करतो. मला तुम्हा सर्वांचा खूप अभिमान आहे. तसेच मी देशातील आणि जगातील महिलांना माझ्या शुभेच्छा देतो. आज मी गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे”, असेही ते म्हणाले.