गुरु रामकृष्ण परमहंस यांची जयंती यावर्षी 12 मार्च रोजी आहे. त्यांचा जन्म फाल्गुन महिन्यातील शुक्लपक्षात द्वितीय तिथीला झाला.
भारतातील एक महान संत, अध्यात्मिक गुरु, असलेल्या रामकृष्णांनी सर्व धर्मातील एकतांवर भर दिला. त्यांना लहानपणापासूनच विश्वास होता की ईश्वराचे दर्शन होतेच म्हणून ईश्वराच्या प्राप्तीसाठी त्यांनी कठोर साधना केली आणि ईश्वराच्या भक्तीतच जीवन व्यतीत केले. स्वामी रामकृष्ण परमहंस मानवतेचे पुजारी होते. साधना करत असताना ते ह्या निष्कर्षावर येऊन पोहोचले की सर्व धर्म सारखे आहेत त्यात भिन्नता नाही, तर ते ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे भिन्नभिन्न साधना ( मार्ग ) आहेत.
त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 मध्ये बंगालमधील कामार्पुकूर गावात गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. पंचांगानुसार त्या दिवशी फाल्गुन शुद्ध द्वितीया होती. गदाधर चटोपाध्याय असे त्यांचे जन्म नाव होते. त्यांचा परिवार अत्यंत पवित्र होता त्यांच्या वडिलांनीच त्यांचे नाव रामकृष्ण ठेवले. बारा वर्षे ते गावातील शाळेत शिकले नंतर शाळा सोडली कारण त्यांना त्यात रस वाटत नव्हता. कामार्पुकूरातील काही धार्मिक स्थळांतील शिक्षित लोकांच्या बरोबर ते बातचीत करत होते. तेव्हा ते पुराण, रामायण, महाभारत आणि भागवत ह्यात पारंगत झाले. ते बंगाली शिकले होते. 1855 साली दक्षिणेश्वरी काली मंदिर बांधले गेले. 56 मध्ये ते पूर्ण झाले त्यांना खात्री होती की त्यांना कालीचे दर्शन होणारच .
पिता खुदीराम आणि माता चंद्रमणी देवी यांची चौथी संतान म्हणजे रामकृष्ण. त्यांच्या जन्माच्या आधी त्यांच्या वडिलांना ईश्वरी साक्षात्कार होऊन स्वप्नात आले की हे चौथे संतान म्हणजे भगवान विष्णूच त्यांच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला येतील. त्यानंतर खुदिराम आणि चंद्रमणी शिवमंदिरात पुजेला गेले असता चंद्रमणीच्या गर्भात दिव्य प्रकाशाने प्रवेश केला असा अनुभव आला.
पुढे 1859 मध्ये रामकृष्णांचा विवाह शारदादेवींबरोबर झाला. त्यावेळी त्या पाच वर्षाच्या होत्या व रामाकृष्ण 23 वर्षाचे होते. जसजशा त्या मोठ्या झाल्या तशा त्या त्यांच्या अनुयायी बनल्या . त्या 18 वर्षाच्या असताना रामकृष्णांबरोबर त्याही दक्षिणेश्वराला गेल्या .
रामकृष्णांच्या अनेक अनुयायांपैकी स्वामी विवेकानंद होते. तंत्र योग आणि अद्वैत वेदान्तातील सामंजस्य यावरील रामकृष्ण परमहंसांच्या व्याख्यानांनी विवेकानंद भारून गेले होते. महाकालीला परमहंसांनी बोलावले की देवी येत होती. ते आपल्या हाताने तिला भोजन भरवत होते. तिच्याबरोबर खेळत फिरत होते ,असे सांगितले जाई .ते ऐकून विवेकानंदांनी रामकृष्णांना ईश्वराचे दर्शन घडवण्याची विनंती केली. रामकृष्णांनी आपल्या लाडक्या शिष्याला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती दिली. पुढे विवेकानंदांनी रामकृष्णांच्या आदेशाने रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
1886 मध्ये गळ्याच्या कॅन्सरमुळे रामकृष्णांना देवाज्ञा झाली.
शैला भट ,सोलापुर
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत