ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं,
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं,
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि।।
अशी ख्याती असलेल्या या सर्वव्यापी गुरुतत्वाला माझा साष्टांग नमस्कार. रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर या गुरुतत्वाबद्दल लिहायला मिळणे यासारखा सुंदर योग नाही.
बंगालमधल्या १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेलेल्या दोन असामान्य विभूती म्हणजे भगवान रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद. ही दोन फक्त नावं नसून दोन तत्वं आहेत. या नावांना एक वलय आहे. धर्म, अध्यात्म, साधना याहीपलीकडे जाऊन “शिवभावे जीवसेवा” या तत्वाला न्याय देणारी एक अलौकिक जोडी. नुसते रामकृष्ण लिहायचे म्हटले तर विवेकानंदांशिवाय त्या चरित्राला पूर्तता नाही. आणि हाच सारखा न्याय विवेकानंदांबद्दल लिहिताना सुद्धा लागू होतो.
‘रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद’ या डॉ. वि. रा. करंदीकर यांच्या पुस्तकातलं एक वाक्य मनात कुठेतरी रुजून बसलंय ते असं की, “शिष्याच्या पराक्रमामुळे गुरुची महती लोकांना कळली आहे. पण जर रामकृष्ण नसते तर विवेकानंद झाले नसते. ही दोन शरीरं वेगळी असली तरी त्या दोघांच्या जीवनाचे प्राणतत्व शेवटी एकच असल्याने ते अखेर एकमेकांशी केवळ एकरूप आहेत.”
गुरू या नावातच विशालत्व आहे. लघु आणि गुरू या संकल्पनेत कायमच दीर्घ आणि विशाल असण्याचा मान फक्त आणि फक्त गुरू अक्षरालाच असतो. इथे गोष्ट फक्त अक्षरापुरती नसून तत्वाची आहे. “त्याग आणि संयम पूर्णपणे अभ्यास करून घेऊन साधकाचं अंतःकरण जेव्हा शुद्ध आणि पवित्र होतं तेव्हा त्याचं मनच त्याचा गुरू होऊन बसतं. त्याच्या त्या शुद्ध मनात त्यावेळी जे भावतरंग उत्पन्न होत असतात ते त्याची कधीही दिशाभूल होऊ न देता त्याला शीघ्र त्याच्या ध्येयाकडे घेऊन जातात.” रामकृष्णांचं हे सांगणं किती सहज आहे! ज्यांच्या मनात इतकं गुरुत्व असेल त्यांचं मन धर्म, जाती याच्याही पलीकडेच असणार! ईश्वरभक्तीसाठी भक्तीचे बाह्य उपचार आणि प्रकार कितीही असले तरी मनाची ईश्वरसमर्पित वृत्ती हाच खरा त्या भक्तीचा गाभा आहे आणि हा गाभा रामकृष्णांना गवसला होता. धर्म – अधर्म, शुद्ध – अशुद्ध, ज्ञान – अज्ञान, पवित्र – अपवित्र याही पलीकडे असलेली साधना आणि दृढभक्ती हेच फक्त सत्य. माँ कालीकडे मागताना सुद्धा त्यांनी “एक तुझी शुद्ध भक्ती मला दे, बाकी काहीही नको” एवढंच मागितलं.
“सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज” हे भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भ भगवद्गीतेत शेवटी अर्जुनाला सांगितले आहे आणि त्यानिमित्ताने सगळ्या भक्तांना ज्याप्रमाणे जसे आश्वासन दिले आहे, तेच आश्वासन रामकृष्णांचा आधार झाले.
धर्म आणि तत्वज्ञान ही दोन शास्त्रे अनुभवाकडे नेणारी हवीत. धर्माविषयी विचार करत असताना त्याबद्दल असलेले विचार हे तर्कशुद्ध आहेत का? त्या विचारांनी समाजहित साधले जाईल की जाणार नाही याचे सुद्धा मूल्यमापन करता यायला हवे. या पद्धतीने रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांनी धर्मविचारात जी काही भर घातली ती विलक्षण आहे. जीव, जगत आणि जगदीश्वर या त्रिविध तत्वांच्या आधारे सिद्धांत मांडणे म्हणजे धर्म आणि तत्वज्ञान नाही तर, या तिघांच्याही स्वरूपाचे निष्पन्न आपल्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवणे हेच खरे साफल्य. हा विचार काही एका विशिष्ट काळापुरता मर्यादित नसून फार दूरदृष्टी असलेला विचार आहे असं मला वाटतं.
या सत्पुरुषांची चरित्र ही केवळ ग्रंथ किंवा पुस्तकांपुरती मर्यादित राहायला नकोत. जेव्हा त्या ग्रंथांमध्ये किंवा पुस्तकात असलेला विचार आपण प्रत्यक्ष जगू तेव्हाच त्यांच्या विचारांचं आचरण आपण करतोय असं म्हणणं जास्त श्रेयस्कर आहे. सत्पुरुष जरी देहाने निघून जात असले तरीसुद्धा त्यांच्या विचारधनांनी कायमच ते अमर असतात. त्यांच्या विचारांना हवी असते ती आपल्या कृतीची जोड. तर आणि तरच आपण धर्माचे उत्तम वाहक आहोत असं म्हणणं योग्य ठरेल.
रामकृष्ण परमहंस यांच्यावर लिहीत असतांना मला महाकवि कालिदास यांनी “रघुवंशम्” या महाकाव्याच्या मंगलाचरणाचा श्लोक आठवला तो असा,
“क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्पविषया मति:।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् ।।”
हा श्लोक कालिदासांनी रघु राजाच्या वंशाबद्दल उद्धृत केला आहे. याचा अर्थ असा की, कुठे सूर्यापासून झालेला हा रघुवंश आणि कुठे अल्पमती असलेला मी? जणू अज्ञानाने एखाद्या लहानशा होडीने दुस्तर असा हा महासागर तरुन जाण्याची इच्छा करीत आहे.
यातली माझी भूमिका सुद्धा त्या लहानशा होडीसारखीच आहे. मी रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल यथामती लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या लिखाणात जे काही छान, उत्तम असेल ते त्या गुरुतत्वाचं आणि ज्या काही उणिवा असतील त्या माझ्या…!
सौ. सायली पेशवे देशपांडे (लेखिका संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. )
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे