दिल्लीचे मुख्यमंत्री यांना ईडीने दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. विशेष कोर्टाने केजरीवालांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान ईडीच्या अटकेपासून संरक्षण जदेण्यासाठी केजरीवालांनी याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने पर्वा रात्री अटकेची कारवाई केली आहे. सध्या अरविंद केजरीवाल हे ७ दिवसांच्या ईडी कोठडीमध्ये आहेत. दरम्यान आता अरविंद केजरीवाल यांनी सुटकेसाठी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीत पाठवण्याचा आदेश बेकायदेशीर असल्याचे सांगून उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली. कथित दिल्ली दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने आप प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. शुक्रवारी दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांना ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान आता हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी कायम राहणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.