ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस… वारकरी संत परंपरेचा, कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आज तुकाराम बीज आहे. म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठागमन केले.
संत तुकाराम महाराज सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा अभंग रचना तुकारामांनी केल्या. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतारी पुरुष होते; परंतु, मानव असूनही सदेह वैकुंठागमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते.
संत तुकाराम महाराजांनी तेव्हाच्या अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आपल्या धारदार वाणीने रान उठवलं होतं. त्यावेळच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकोबारायांनी दिलं. अगदी छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकोबाराय यांना आदर्श मानत. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. संत तुकारामांनी १६५० साली फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुस-या दिवशी मध्यान्हाला आपला देह सोडला असं सांगितलं जातं.
मराठी संस्कृतीतील भक्ती पंथाचे एक महान प्रवर्तक, संत तुकाराम यांची जगभरात लाखो लोक पूजा करतात आणि लोक त्यांचे अभंग आणि शिकवणींपासून प्रेरणा घेतात.
तुकाराम बीजेचा सोहळा याचि डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी करतात. तुकोबारायांच्या नामाच्या जयघोषात आसमंत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातलं एक झाड थरारतं असं सांगितलं जातं.आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा’, असं म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी देहू नगरीतून सदेह वैकुंठागमन केलं तो दिवस तुकाराम बीज म्हणून आजही साजरा केला जातो. तुकाराम बीज सोहळ्याला लाखो वारकरी आवर्जून उपस्थित राहतात.
पद्मा तारके , सोलापूर.
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत