लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज बिहारमध्ये प्रचारसभेला संबोधित केले. नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये एनडीएच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमुई मध्ये रॅलीला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, ही निवडणूक विकसित बिहारचे स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे. एका बाजूला काँग्रेस (Congress) आणि आरजेडीसारखे (RJD) पक्ष आहेत ज्यांनी आपल्या सरकारच्या काळात संपूर्ण जगात देशाचे नाव कलंकित केले होते, तर दुसरीकडे भाजप आणि एनडीए आहेत, ज्यांचे एकमेव ध्येय आहे विकसित भारत घडवणे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जमुई येथील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा भारत शत्रूच्या घरात घुसून मारतो. काँग्रेसच्या काळात भारत हा गरीब आणि कमकुवत देश मानला जात होता. आज पिठासाठी हात पसरणारे लहान देशांचे दहशतवादी आपल्यावर हल्ले करून निघून जायचे आणि तत्कालीन काँग्रेस तक्रारी घेऊन इतर देशात जात असे. असे चालणार नाही. आजचा भारत घराघरात घुसून मारतो. आजचा भारत जगाला दिशा दाखवतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले. १० वर्षात जे काही झालं ते फक्त ट्रेलर आहे, अजून खूप काम करायचं आहे. आपल्याला बिहार आणि देशाला खूप पुढे न्यायचे आहे. गरिबीची झळ सोसून हा मोदी इथपर्यंत पोहोचला आहे.
”सरकारने जनतेला मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला. येथून एक्स्प्रेस वे होणार, मेडिकल कॉलेजही सुरू होणार. गया विमानतळाच्या विस्तारीकरणाचीही तयारी सुरू आहे. संपूर्ण बिहारमध्ये रस्ते पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रुपये खर्च करत आहे. यासाठी अनेक संधी निर्माण होत आहेत. पुढे ते म्हणाले, संपूर्ण बिहार म्हणत आहे पुन्हा एकदा एनडीए सरकार. माझा धाकटा भाऊ चिराग पासवान रामविलास जी यांचा विचार पूर्ण गांभीर्याने पुढे नेत आहे याचे मला समाधान आहे. बिहारची भूमी संपूर्ण देशाला दिशा दाखवत आहे. तसंच ही जाहीर सभा नसून विजयी सभा आहे. बिहारमधील 40 जागा एनडीएला दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांना सलाम करतो, असे पंतप्रधान म्हणाले.