*जालियनवाला बाग:* पंजाबमधील अमृतसर शहरातील ब्रिटिश लष्कराने केलेल्या हत्याकांडाचे हे स्थळ. येथे १३ एप्रिल १९१९ रोजी रौलट कायद्याविरुद्धच्या म. गांधींच्या सत्याग्रहास प्रतिसाद देण्याकरिता सु. २०,००० लोक जमले होते. सभेत लाला हंसराजसारखे काही नेते भाषण करीत होते. त्या वेळी ब्रिगेडियर-जनरल एडवर्ड हॅरी डायर याने निवडक ९० सैनिकांच्या मदतीने एकदम गोळीबार केला. हा गोळीबार १० मिनिटे चालू होता आणि एकंदर १,६५० फैरी झाडण्यात आल्या. त्यात असंख्य लोक मृत्युमुखी पडले. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले.
ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या हत्याकांडाची चौकशी करण्याकरिता ब्रिटीश सरकारने हंटरच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, तसेच काँग्रेसनेही पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. दोन्ही समित्यांनी दिलेल्या मृत्यूच्या आकडेवारीत तफावत होती. काँग्रेसच्या मते १,००० लोक मेले, तर सरकारच्या अधिकृत बातमीनुसार ३७९ लोक मेले व १, २०० जखमी झाले. डायरच्या या निर्घृण कृत्याचे समर्थन ले. ग. मायकेल ओड्वायर याने केले. या हत्याकांडाची ब्रिटीश सरकारने फारशी दखल घेतली नाही, परंतु म. गांधींच्या सत्याग्रहाला व एकूण स्वातंत्र्य चळवळीला यांमुळे अधिक धार आली.
जालियनवाला बागेतील निरपराध लोकांच्या हत्याकांडाने अनेक क्रांतिवीरांना स्फूर्ती मिळाली. उधमसिंगांसारखे क्रांतिकारक यामुळे अधिक चिडले. उधमसिंगांनी भारताच्या या मानहानीचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याकरिता पैसे जमवून ते इंग्लंडला शिक्षणाच्या निमित्ताने गेले. त्यांनी एक पिस्तूल मिळवले आणि संधी साधून १३ मार्च १९४० रोजी सर मायकेल ओड्वायर याला ठार करून आपला बेत तडीस नेला. त्याबद्दल त्यांना जून १९४० मध्ये फाशी देण्यात आली. १९६९ मध्ये जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा पन्नासावा स्मृतिदिन साजरा झाला. तसेच नुकतेच २०२१ साली ‘सरदार उधम’ हा जालियन बाग हत्याकांड याला प्रक्षेपित करणारा व आत्ताच्या पिढीला इतिहासातील घटनेला ज्ञात करून देणारा चित्रपट प्रकाशित करण्यात आला.
प्रियांका सुदामे
सौजन्य – समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत