Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) हे राजकीय मैदानात उतरले आहेत. ते सध्या राजकीय दौरे करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी राजकीय दौऱ्यांदरम्यान प्रचार सभांमध्ये महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आज (22 एप्रिल) शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करताना शरद पवारांनी माफी मागितली आहे.
शरद पवार म्हणाले की, अमरावतीत आल्यानंतर मला अनेक जुन्या गोष्टी आठवतात. मी सार्वजनिक जीवनात कामाला सुरूवात केल्यानंतर तरूणांच्या चळवळीत सहभागी झालो होतो. मी महाराष्ट्रभर फिरलो, पण अमरावती हे असं ठिकाण होतं तिथून तरूणांची एक शक्ती उभी राहिली आणि आम्हा सर्वांना काम करण्यासाठी अमरावतीकरांनी प्रोत्साहन दिलं होतं.
मी आज येथे आलोय ती एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. कारण माझ्याकडून एक चूक झाली आहे. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या होत्या. नंतर लोकांनी माझं ऐकलं आणि त्या उमेदवारा पाठिंबा दिला, खासदार केलं. पण मागील पाच वर्षातील त्यांना अनुभव पाहिल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली आहे. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. आम्हाला ती चूक आता दुरूस्त करायची आहे. आता बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असे शरद पवार म्हणाले.
मागच्या वेळी मी नवनीत राणांना पाठिंबा देऊन चूक केली होती. आता ती चूक कधी होणार नाही. मी ती चूक दुरूस्त करणार आहे, आता बळवंत वानखेडे यांना विजयी करा, असे आवाहन शरद पवारांनी केले.