अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे देशभर दौरे आयोजित केले आणि या प्रश्नावर जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी अस्पृश्यता निवारण परिषदा भरविल्या. सन १९१७ मध्ये कोलकत्ता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला.
अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी महर्षी शिंदे यांनी २३ व २४ मार्च १९१८ रोजी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली होती. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्योद्धारासाठी केलेल्या कार्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या कार्याला आपल्या जीवनाचे उद्दिष्ट बनविले होते.
अस्पृश्यांविषयी त्यांच्या मनात करुणा ओतप्रोत भरली होती. अस्पृश्यांसाठी जिव्हाळ्याच्या भावनेतून कार्य करणारे आणि त्यासाठी सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची तयारी ठेवणारे महात्मा फुले यांच्यानंतरचे महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक महर्षी शिंदे होत. अस्पृश्यता निवारणाचे कार्य करण्यासाठी ते आपल्या कुटुंबीयांसह अस्पृश्यांच्या वस्तीत राहावयास गेले.
अस्पृश्य बांधवांच्या सुखदुःखांशी ते खऱ्या अर्थाने एकरूप झाले. त्याबद्दल त्यांनी आपल्या ज्ञातिबांधवांचा रोषही पत्करला. त्यांच्या जातीच्या लोकांनी त्यांची ‘ महार शिंदे ‘ म्हणून हेटाळणी केली. द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी त्यांचा ‘आधुनिक काळातील महान कलिपुरुष‘ असा निषेध केला होता. परंतु अशा प्रकारच्या संकटांनी डगमगून न जाता किंवा समाजाकडून होत असलेल्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. सन १९३३ मध्ये ‘ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न ‘ हे पुस्तक लिहून या प्रश्नाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्यात त्यांच्या भगिनी जनाक्का यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांनी अस्पृश्यांच्या वस्तीत राहून दलित बांधवांची सेवाशुश्रूषा केली. त्यांच्या मुलाबाळांची सर्व प्रकारे काळजी घेतली आणि त्या त्यांच्यापैकीच एक बनून राहिल्या.
लेखक – प्रा. डॉ. डी. डी. कुंभार
सौजन्य -विश्व संवाद केंद्र,पुणे