पुणे – शेकडो वर्षांपूर्वी भगवान महावीर यांनी दिलेले विचार आजही जिवंत आहेत. येणाऱ्या समस्यांचे निराकरण हवे असेल तर भगवान महावीरांच्या विचारांवर चालले पाहिजे. तेच आपल्यासाठी आदर्श आहेत असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले.
तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त हिंदी विवेक प्रकाशित ‘तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यातील गोयल गार्डन येथे झाले. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनाचे औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महावीर वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाला उपाध्याय प. पू. प्रवीण ऋषीजी महाराज, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, सुहाना प्रवीण मसालेवालेचे संचालक विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया उपस्थित होते.
आंबेकर पुढे म्हणाले की, मानव कल्याणासाठी केलेली तपस्या जन्मोजन्मातरची साधना आहे. राष्ट्राची साधना हजारो वर्षांची आहे. विदेशींच्या आक्रमणात संत महात्म्यांनी आपल्या विचारातून राष्ट्राला मजबूत बनवले. आपल्या पूर्वजांनी मानव कल्याणाच्या विचारांवर विश्वास ठेवून विदेशी संकटांपासून राष्ट्राला वाचविले. संघर्ष काळात राष्ट्राच्या जीवन मूल्यांना आत्मसात केले या मूल्यांना आत्मसात केल्यानेच व्यक्ती चरित्रवान होतो. एकता, संस्कृती, भौतिक सांस्कृतिक संपन्नता महत्त्वाची आहे. अशा कार्यात आपण सहभागी होऊन याच मार्गावर चालावे असे आवाहन त्यांनी केले. संतांचे वचन, विचार विवेकने परिश्रमाने सर्वांसमोर ठेवले त्याबद्दल आंबेकर यांनी विवेक मासिक पत्रिकेच्या परिवाराचे अभिनंदन केले.