नाशिक येथील शंकराचार्य न्यासाचा स्तुत्य उपक्रम
हिंदू समाजातील अनुसूचित जाती, जमातीच्या समाजाच्या घरात बारसे, लग्नविधी आणि इतर धार्मिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध होत नसल्याने त्या समाजातील तरुणांना पूजा प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली. शंकराचार्य न्यासाने पुढाकार घेऊन समाजात सद्भाव निर्माण होण्यास या उपक्रमाचा उपयोग होईल या हेतूने पूजा प्रशिक्षणाची जबाबदारी स्विकारली. अनादी काळापासून चालत आलेल्या हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नुकताच नाशिक येथे हा वर्ग झाला. त्यात ३० जणांनी सहभाग घेतला.
ग्रामीण भागात तसेच विशेष करून खेडोपाडी आणि पाड्यांवर हिंदू संस्कृतीच्या पद्धतीने विविध विधी करण्यासाठी कोणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे याच परिसरातील युवक आणि नागरिकांना या वर्गाच्या माध्यमातून पूजेचे प्रशिक्षण देण्यात येते. या माध्यमातून त्या गावात असलेल्या लहान मोठ्या मंदिरांमध्ये किंवा गावातील लग्नकार्य यासारख्या विविध कार्यक्रमांसाठी हिंदू धर्माप्रमाणे पूजा करण्यास पुरोहित उपलब्ध होऊ शकत आहेत. समाजामध्ये जातीभेद संपावेत आणि सर्वच समाज एकसंघ व्हावा यासाठी डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य प्रयत्नशील होते.
सन २०१२ पासून न्यासाच्या बालाजी मंदिर, नाशिक, सोमेश्वर (गंगापुर) येथे पुजा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला. या वर्गात येणाऱ्या प्रशिक्षणार्थीच्या निवास, भोजन आदि साहित्याची व्यवस्था न्यासातर्फे करण्यात येते. पूजा प्रशिक्षणाचा कालावधी १२ ते १५ दिवसाचा असते त्यांना पूजा प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांनी स्विकारली आहे. त्यात राणीभवन मधील महिला पुरोहितांचा सहभाग सुध्दा उल्लेखनीय आहे. पूजा प्रशिक्षणाच्या वर्गात विद्यार्थ्यांना संस्कृत संभाषण, पूजेचे प्राथमिक ज्ञान, पंचाग वाचन, अष्टग्रह पुजा, सत्यनारायण, नामकरण विधी, लग्नविधी, अंत्यविधी या विषयीचे ज्ञान दिले जाते.
प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना रामकुंडावरील संस्काराची माहिती नाशिकच्या पुरोहित वर्गाकडून दिली जाते. कपालेश्वराचे दर्शन झाल्यावर काळाराम मंदीरात हे विद्यार्थी सामुहिक रामाची आरती करतात त्यावेळी या प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्वांना झालेला आनंद अवर्णनीय असतो. स्थानिक पुरोहितांचे मार्गदर्शन त्यांना लाभते. गेल्या १३ वर्षात सात जिल्ह्यातील ४७५ प्रशिक्षणार्थींनी या पूजा प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. तर यावर्षी ३० जणांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. नुकताच या वर्गाचा समारोप आणि प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम झाला.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख ह. भ. प. माधवदास राठी, सामाजिक समरसता गतीविधीचे पश्चिम क्षेत्र कार्यकारणी सदस्य निलेश गद्रे, पश्चिम क्षेत्र प्रमुख महेंद्र रायचुरा, महाराष्ट्र प्रांत धर्म जागरण संयोजक नितीन कमळापूरकर उपस्थित होते. नितीन कमळापूरकर यांनी धर्म जागरणची आवश्यकता व त्याचे पूजा प्रशिक्षण वर्गासाठी असलेले महत्त्व सांगितले. ह. भ. प. माधवदास राठी यांनी पूजा प्रशिक्षण वर्गासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थींना जनजाती क्षेत्रामध्ये धर्माचे काम कसे करावे याबाबत आशीर्वाचन दिले. तर निलेश गद्रे यांनी समरसता या विषयावर पूजा प्रशिक्षणाचा प्रभावी परिणाम कसा होतो याबाबत मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजात पुजारी म्हणून मान्यता मिळाली असून त्यांच्याकडून धार्मिक विधी कार्य करवून घेतली जातात. या पूजा प्रशिक्षणाचा लाभ हिंदु मोची, लमाण, वारली, कोकणा, ढोर, महार, लोहार, कोळी, मांग, रामोशी, मराठा, कुणबी अशा अनेक जातीमधील तरूणांनी घेतला आहे.
अनुसूचित जाती-जमातींतील तरुण या वर्गाचा लाभ घेत आहेत या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी धर्मजागरण ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते नाशिक व त्रंबकेश्वर येथील पुरोहित वर्ग व न्यासाचे सर्व विश्वस्तयांनी परिश्रम घेतले. समाजात सद्भाव निर्माण होण्यास या उपक्रमाचा उपयोग होत असून समाजातील सर्व घटक एक समान असून कुठल्याही प्रकारची उचनीचता येथे नाही याची अनुभूती येते. हिंदू समाजामध्ये सर्वांना पूजा करण्याचा अधिकार पहिल्यापासून होता. या पूजा प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने सामाजिक उन्नयनासाठी समरसतेचा वस्तुपाठच जणू प्रत्यक्षात आला आहे. आपापल्या समाजात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आवश्यकतेनुसार सर्वजण करत आहेत. अनेकांना त्यातून प्रतिष्ठा आणि व्यवसायाची संधी उपलब्ध झाली आहे.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र ,पुणे