Army helicopter crashes in Colombia : उत्तर कोलंबियामध्ये (Colombia) एक दुःखद घटना घडली आहे. सैनिकांसाठी साहित्य घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर ग्रामीण भागात कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील नऊ जवानांचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताबाबत कोलंबियाच्या लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, हेलिकॉप्टर सांता रोसा डेल सुरच्या नगरपालिकेत सैन्यासाठी पुरवठा करत होते. तर सध्या या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.
हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी क्रॅश झाले ते ठिकाण अलीकडेच नॅशनल लिबरेशन आर्मी गनिमी गट आणि गल्फ क्लॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मादक पदार्थांची तस्करी करणारी टोळी यांच्यातील लढाईचे साक्षीदार आहे. लष्कराने या घटनेला अपघात घोषित केले आहे. लष्कराच्या या घोषनेनंतर हेलिकॉप्टरवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सोमवारी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लष्करी हेलिकॉप्टरमधील नऊ जणांच्या मृत्यूबद्दल मला खेद वाटतो. ते आखाती वंशाविरुद्ध कारवाई करत असलेल्या सैन्याला वस्तू पुरवत होते.”
या अपघाताबाबत लष्कराने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:50 वाजता हेलिकॉप्टर क्रॅश झाले. हे एमआय-17 रशियन बनावटीचे हेलिकॉप्टर होते. याचा उपयोग अनेकदा सैन्याची वाहतूक तसेच पुरवठा करण्यासाठी केला जात असे. हा अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमधील एकही सैनिक वाचला नाही. तर सध्या या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.