लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ५ व्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. राज्यातील १३ जागांवर मतदान होणार आहे. दरम्यान मुंबईतील ६ जागांवर आणि ठाणे, कल्याण व पालघर या जागांवरील उमेदवारांसाठी आज मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज सभेसाठी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे हे पहिल्यांदाच मंचावर एकत्रित आले होते. मनसेने महायुतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तिसऱ्यांदा हिंदुस्तानचे बनणारे पंतप्रधान असा उल्लेख ठाकरेंनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, ”उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर बोलून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी वेळ घालवला. जे सत्तेतच येणार नाहीयेत, त्यांच्याबद्दल आपण का बोलायच? अयोध्येत कारसेवकांना मुलायमसिंह यादवांच्या लोकांनी ठार मारले. त्यांची प्रेते शरयू नदीत फेकून दिली. मोदीजी आपण होतात म्हणूनच हे राम मंदिर होऊ शकले. अन्यथा ते झालेच नसते. इतक्या वर्षांपासून असलेले कलम ३७० हटवून दाखवले. मोदींनी अनेक धाडसी निर्णय घेतले. १० वर्षांमध्ये अनेक योजना राबवल्या गेल्या.”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, ;;मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, खरा इतिहास पाठयपुस्तकातून शिकवला जावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समिती नेमावी, मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे अशा माझ्या काही अपेक्षा मोदीजी तुमच्याकडून आहे.
आजच्या शिवाजी पार्कवरील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्रीमंडळातील सहकारी , महायुतीचे नेते उपस्थित होते. तसेच मुंबईतील ६ उमेदवार, पालघर, ठाणे , कळ्यांचे उमेदवार देखील उपस्थित होते. एनडीए प्रणित भाजपा सरकारने अब की बार ४०० आणि फार एक बार मोदी सरकार अशा घोषणा दिल्या आहेत.