हरियाणाच्या अंबाला जिल्ह्यात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आले आहे. या अपघातात 19 जण जखमी झाले आहेत. हे सर्व लोक वैष्णोमातेच्या दर्शनासाठी ट्रॅव्हल्सने जात होते. समोरून येणाऱ्या ट्रॉलीला प्रवासी धडकल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये सहा महिन्यांची मुलगी आणि एका जोडप्याचाही समावेश आहे. सर्व लोक उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. अंबाला-दिल्ली महामार्गावरील मोहराजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एकूण २६ जण प्रवासी या ट्रॅव्हल बस मधून प्रवास करत होते.
या अपघातात ट्रॅव्हल्सचा काही भाग पुर्णपणे निकामी झाला असून जखमी इकडे तिकडे महामार्गावर पडले आहेत. काही जखमी ट्रॅव्हलरमध्येच अडकले होते. आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमींना बाहेर काढले आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेतून अंबाला कॅन्टोन्मेंट सिव्हिल हॉस्पिटल आणि आदेश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ कौशल कुमार यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.
जखमी धीरजने मोहरा पोलिसांना सांगितले की ते 23 मे रोजी संध्याकाळी वैष्णोदेवीकडे निघाले होते आणि सर्व एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. मोहडाजवळ येताच अचानक ट्रॉलीसमोर वाहन आले. ट्रॉलीने ब्रेक लावताच ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मृतांमध्ये विनोद, मनोज, गुड्डी, माहेर चांद, सतबीर, ६ महिन्यांची दीप्ती आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे.
जखमींपैकी फक्त राजींद्र, कविता, वंश, सुमित, सरोज, नवीन, ललता प्रसाद, अनुराधा, शिवानी, आदर्श, राधिका आणि धीरज यांची ओळख पटली. अपघाताचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.