गेल्या काही दिवसांत राज्यात पाण्यात बुडून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उजनी धरणात देखील ६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील खलाशांची बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बंदरात एक बोट उलटून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बंदरात मच्छीमार बोटींसाठी लागणार बर्फ घेऊन जाणारी बोट पलटली आहे. त्यामध्ये एकूण ७ खलाशी होते. बोट उलटल्यानंतर तीन जणांनी पोहत येऊन समुद्रकिनारा गाठला. त्यातील चार जण बेपत्ता होते. तर शोधमोहीम करणाऱ्या पथकाला आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर दोन जणांचं शोध अजूनही सुरूच आहे. राज्यभरात गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या घटना घडून १८ जणांना पाण्यात बुडून आपले प्राण गमवावे लागले आहेत.