सध्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून देशभरात
जोरदार प्रचार करण्यात येत आहे. लोकसभेसाठी ७ व्या म्हणजेच अखेरच्या टप्प्यातील
मतदान बाकी राहिले आहे. ४ जून रोजी या देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार की,
एनडीए
तिसऱ्यांदा सरकार बनवणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र निवडणुकीचा कार्यक्रम सुरु
असतानाच मणिशंकर अय्यर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे या
विधानाबद्दल त्यांना माफी देखील मागावी लागली आहे. तर हे विधान नक्की काय होते ते
जाणून घेऊयात.
१९६२ च्या चिनी हल्ल्याबद्दल बोलताना मणिशंकर अय्यर यांनी समोर कथित
शब्द वापरला. मात्र, नंतर त्यांनी याबाबत माफी मागितली. अय्यर मंगळवारी फॉरेन
करस्पॉन्डंट्स क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात गेले होते. यादरम्यान अय्यर यांनी एक
किस्सा सांगितला. ज्यामध्ये त्यांनी ऑक्टोबर १९६२ च्या चिनी आक्रमणासंदर्भात कथित
शब्द वापरला होता. ते म्हणाले, ‘ऑक्टोबर १९६२ मध्ये चिनी लोकांनी
भारतावर कथित हल्ला केला.‘ या वक्तव्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी
माफीही मागितली आहे. ते म्हणाले, “चीनी हल्ल्यापूर्वी कथित शब्द चुकून
वापरल्याबद्दल मी बिनशर्त माफी मागतो.”
अय्यर यांच्या वादग्रस्त विधानांची
मालिका काही नवीन घटना नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली
आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाला
होता ज्यामध्ये ते पाकिस्तान हे एक आदरणीय राष्ट्र आहे आणि त्यांच्याकडे अणुबॉम्ब
देखील आहे, त्यामुळे भारताने त्याचा आदर केला पाहिजे असे ते म्हणताना दिसत होते.