Manmohan Singh On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या प्रचारादरम्यान राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हवाला देत मुस्लिम समुदायासंदर्भात विधान केले होते. ज्याला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गेल्या महिन्यात राजस्थानमधील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “मनमोहन सिंग यांच्या सरकारने संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे, असे म्हटले होते.” पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर काही आठवड्यांनंतर मनमोहन सिंग यांनी आता पलटवार केला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून त्यांच्या द्वेषपूर्ण आणि असंसदीय भाषणांनी पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा खाली आणल्याचा आरोप त्यांच्यावर केला. त्यांनी भाजपवर एका विशिष्ट समुदायाला वेगळे करण्याचा आरोप केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वी देशातील जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात मनमोहन सिंग यांनी गुरुवारी म्हटले की, “मी या निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय चर्चा अतिशय काळजीपूर्वक पाहत आहे. मोदीजींनी घृणास्पद द्वेषपूर्ण भाषणे दिली आहेत. ते एकप्रकारे फूट पाडणारे आहेत, मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी पदाची प्रतिष्ठा तसेच पंतप्रधान कार्यालयाचे गांभीर्य कमी केले आहे, अशी टीका मनमोहन सिंह यांनी केली आहे.