लोकसभेचे मतदान संपल्यानंतर आणि निकाल लागण्याच्या आधी एक दिवस निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद होणार असल्याची बातमी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. लोकसभेचा निकाल येण्याआधी पत्रकार परिषद घेण्याची निवडणूक आयोगाची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.
लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे असे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या निमंत्रणात नमूद करण्यात आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर उपनिवडणूक आयुक्त पत्रकारांना माहिती देत असत, मात्र आता ही प्रथा रद्द करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्ष आणि इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही मागण्या मांडल्या, त्यानंतर ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली अशी माहिती समोर आली आहे.मतदानाची टक्केवारी आणि मतमोजणीबाबत आयोगातर्फे महत्त्वाची घोषणा करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान 1 जून रोजी देशातील सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आला. तसेच इंडिया आघाडीचे बरेच नुकसाना झाल्याचा दावाही करण्यात आला. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये एनडीएने 350 हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, इंडिया आघाडीने हे एक्झिट पोल स्वीकारण्यास नकार दिला असून या निवडणुकीत इंडिया अलायन्स 295 जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला आहे.