उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. चार धाम यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंनी भरलेला एक टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला आहे. या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील भाविक दर्शन घेऊन ऋषिकेशला परतत होते. यावेळी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर यात्रेकरूंनी भरलेला एक टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला. चारधाम यात्रा आटोपून परतत असलेला टेम्पो ट्रॅव्हलर सम्राट खाखराजवळ नदीत पडल्याने यात्रेकरूंकडून मदतीसाठी आरडाओरडा सुरू होता. तर ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
दरम्यान, सध्या घटनास्थळी एसडीआरएफची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. अपघात झाला त्यावेळी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 17 ते 28 यात्रेकरू होते. तर या अपघातातील जखमींना पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकाने बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.