भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे तणाव निर्माण झाला आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या वतीने आज जिंतूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज सकाळपासून जिंतूर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट करणारा मुलगा हा अल्पवयीन आहे. त्याच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या जिंतूर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या जिंतूर शहरात शांतता असून, कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बीड मध्ये देखील आक्षेपार्ह पोस्टमुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते. बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. अशातच आता पुन्हा एकदा परभणीत अशी घटना घडली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा चुरशीच्या लढाईत पराभव झाला होता. बजरंग सोनावणे यांनी या लढतीत विजय मिळविला. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या काही समर्थकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.